मेघन मार्कल आणि प्रिन्स हॅरी आपले घरकुल थाटणार या राजवाड्यात


नवपरिणीत शाही दाम्पत्य, मेघन मार्कल आणि प्रिन्स हॅरी आता लवकरच आपल्या नवीन घरकुलामध्ये राहायला जाणार आहेत. शाही घराण्याची ‘ग्रेड-२ लिस्टेड प्रॉपर्टी’ असलेला अॅडलेड हॉल राणी एलिझाबेथने या नवदाम्पत्याला देऊ केला आहे. विंडसरमधील शाही मालमत्तेचा भाग असलेल्या या कॉटेजमध्ये लवकरच मेघन आणि हॅरी आपला संसार थाटणार असल्याचे समजते.

या कॉटेजमध्ये एकेकाळी पीटर टाऊनसेंड रहात असत. राणी एलिझाबेथची दिवंगत बहिण प्रिन्सेस मार्गारेट आणि पीटर टाऊनसेंड यांचे प्रेमसंबंध होते. त्यांना एकमेकांशी विवाह करण्याचीही इच्छा होती. पण पीटर यांचे आधीच एकदा विवाहित असल्याने आणि घटस्फोटीत पुरुषाशी लग्न करण्यावर शाही घराण्याने हरकत घेतल्याने हा विवाह होऊ शकला नव्हता. त्या काळी पीटर टाऊनसेंड यांच्याशी विवाह करून शाही घराण्याकडून मिळत असलेल्या सर्व सवलतींचा त्याग करणे, किंवा शाही घरण्याची सदस्य बनून राहण्यासाठी पीटर यांच्याशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणणे असे पर्याय मार्गारेट समोर असता, तिने पीटरना सोडून शाही घरण्याची सदस्य बनून राहणे पसंत केले. त्यानंतर पीटर यांची बदली इतरत्र करण्यात आल्यामुळे त्यांनीही परप्रांतात स्थलांतर केले.

मेघन आणि प्रिन्स हॅरी यापूर्वी केंसिग्टन पॅलेस मधील नॉटिंगहम कॉटेज मध्ये वास्तव्यास होते. पण आता मात्र ते आपले बस्तान हलवून अॅडलेड हॉल येथे वास्तव्यास जाणार असल्याचे समजते. हे सुबक कॉटेज विंडसरच्या राजवाड्याचाच एक भाग असून, राजा चौथा विलियम याची पत्नी राणी अॅडलेड हिच्यासाठी विश्रांतीगगृह म्हणून या कॉटेजचे निर्माण १८३१ साली करण्यात आले होते.

हे कॉटेज दुमजली असून, फ्रेंच केसमेंट असणाऱ्या खिडक्या, विशाल शयनकक्ष आणि संगमरवरी ‘ग्रेको-इजिप्शियन’ धाटणीच्या ‘फायर प्लेसेस’ या कॉटेजची खासियत आहेत. विंडसरचा राजवाडा प्रिन्स आणि मेघन यांच्यासाठी त्यांच्या आठवणींचा भाग आहे. त्यांचा विवाह देखील याच राजवाड्यामध्ये असलेल्या सेंट जॉर्ज चॅपल मध्ये पार पडला होता. त्यामुळे विंडसर राजवाड्याचाच भाग असलेल्या अॅडलेड कॉटेजमध्ये वास्तव्यास जाण्यास हे शाही नवदाम्पत्य उत्सुक असल्याचे समजते.

Leave a Comment