तब्बल १२१ कोटी किमतीची कार पगानी झोंडा एचपी बर्चेटा


जगातल्या सुंदर आणि दुर्मिळ म्हणता येतील अश्या डिझाईनच्या कार बनविणाऱ्या पगानी ऑटो एसपीए कंपनीने गुडवूड फेस्टिवल ऑफ स्पीड मध्ये उपस्थितांचे लक्ष आकर्षून घेणाऱ्या खास कारचे प्रदर्शन केले आहे. पगानी झोंडा एचपी बर्सेटा नावाने सादर झालेली हे कार फारच खास असून तिची किंमत आहे १२१ कोटी. यात अतिरिक्त करांचा समावेश नाही. या गाडीची तीनच युनिट बनविली गेली असून ती सर्व विकली गेली आहेत. जगातील सर्वात महागडी कार अशी या गाडीची नोंद झाली आहे.

या कारचे आणखी एक विशेष म्हणजे होरासियो पगानी याच्या ६० व्या वाढदिवसानिमित ती तयार केली गेलीच पण प्रथमच त्यांचे नाव गाडीच्या मॉडेल मध्ये समाविष्ट केले गेले आहे. या तीन युनिट पैकी एक होरासियो यांनी स्वतःकडे ठेवली आहे. हि कार म्हणजे झोंडा ७६० सिरीज आणि होरोयो बीसी या मॉडेलचे मिश्रण आहे. या कारला ७.३ लिटरचे मर्सिडीज एएमजी एम १२० व्ही १२ इंजिन दिले गेले असून ६ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन दिले गेले आहे. कारला हूड नाही म्हणजे ती रुफलेस कार आहे. इंटिरियरमध्ये महागडे लेदर तसेच बॉडीसाठी कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे.