आरोग्यासाठी गुणकारी खरबूज


खरबूज हे फळ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत उन्हात राहिल्याने, किंवा सतत घाम आल्याने शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊन डीहायड्रेशन होते. डीहायड्रेशन प्रमाणाबाहेर वाढले, तर अशक्तपणा येणे, चक्कर येणे अश्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे समस्या उद्भविण्याआधीच त्याची उपाययोजना करणे जास्त योग्य ठरते. त्याकरिता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी भरपूर पिणे तसेच ज्या अन्नपदार्थांमध्ये पाण्याची मात्रा अधिक असेल, अश्या पदार्थांचे सेवन आपल्या आहारामध्ये करणे आवश्यक असते. खरबूज असे फळ आहे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक आहे.

ह्या फळाच्या सेवनाने शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच या फळाच्या सेवनाने शरीराला फायबर मिळत असून, त्यामुळे पचनतंत्रही सुरळीत राहते. खरबूज हे क जीवनसत्वाचे आणि अँटीऑक्सिडंटस् चे उत्तम स्रोत आहे. क जीवनसत्व आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास सहायक असते. तसेच या जीवनसत्वामुळे आपल्या आहारातील अन्य पोषक घटक शरीरामध्ये अवशोषित होण्यास मदत होते. या जीवनसत्वामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडत नाहीत आणि डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.

खरबूजामध्ये ९५ टक्के प्रमाण पाण्याचे असते. यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक ती सर्व जीवनसत्वे आणि क्षार असतात. ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेसचा त्रास होतो, त्या व्यक्तींसाठी खरबुजाचे सेवन लाभकारी आहे. यामध्ये असणारे पोटॅशियम हे तत्वही निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. या तत्वामुळे दिवसभराच्या धावपळीनंतरही शरीरामध्ये चैतन्य आणि उत्साह टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना शारीरिक श्रम अधिक करावे लागतात, त्यांनी या फळाचे सेवन आवर्जून करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment