न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये आता विद्यार्थी शिकणार शीख धर्माची महती


अमेरिकेतील नियर प्रांतातील शाळांमध्ये आता शीख धर्माबाबत शिक्षण देण्यात येणार आहे. शुक्रवारी या अभ्यासक्रमाची औपचारिक घोषणा करण्यात आली. मात्र त्याची अनौपचारिक सुरुवात सप्टेंबर 2016 मध्ये काही शहरांमध्ये झाली होती.

या उपक्रमानुसार शीख धर्म आणि परंपरांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येईल, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ‘यूनाइटेड सिख्स’ नावाच्या गैर सरकारी संघटनेने यासंदर्भात न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागाशी सहकार्य करार केला आहे. अमेरिकेत सुमारे पाच लाख शीख व्यक्ती राहात असल्याचा अंदाज आहे.

“आम्ही ज्या अमेरिकी व्यक्तींचे सर्वेक्षण केले त्यांच्यापैकी 70 टक्के लोकांना शीख धर्माबाबत काहीही माहिती नाही. अमेरिकी विद्यार्थ्यांना आपल्या शीख वर्गमित्रांबाबत माहिती नाही. आम्ही कोण आहोत, आमचे मूळ काय, आम्ही कोणत्या देशातून येतो याबाबत त्यांना काहीही माहित नाही,” असे ‘यूनाइटेड सिख्स’चे वरिष्ठ धोरण सल्लागार प्रीतपाल सिंह यांनी सांगितले. आम्ही भारतातून आलो आहोत हे त्यांना समजतच नाही, अशी कैफियत त्यांनी फॉक्स एन वाय या वाहिनीशी बोलताना केली.