विमानप्रवासाप्रमाणेच आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार या ट्रेनमध्ये


दोन नवीन मार्गांवर प्रवास करण्यास भारतीय रेल्वेची तेजस एक्स्प्रेस आता संपूर्णपणे सिद्ध आहे. ही तेजस एक्स्प्रेस आपल्या नव्या अवतारामध्ये प्रवाश्यांच्या स्वागतासाठी सिद्ध आहे. ‘तेजस’चे नवे रूप आधीच्या रूपापेक्षा पुष्कळच ‘ग्लॅमरस’ म्हणावे असे आहे. या नव्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना विमानाच्या प्रवासाप्रमानेच सुविधा देण्यात येणार आहेत. यात्रेकरूंसाठी नव्या, अधिक आरामदायक सुविधा घेऊन येणारी तेजस लवकरच धावू लागणार आहे.

ही नवी ट्रेन नवी दिल्लीहून चंडीगड आणि दिल्लीतील आनंद विहार स्टेशनपासून लखनऊ, अश्या दोन वेगळ्या मार्गांवर धावणार आहे. नवी ‘तेजस’ नारिंगी, पिवळ्या आणि भुऱ्या रंगांच्या रंगसंगतीमध्ये रंगविण्यात आली असून, या पूर्वी तेजस एक्स्प्रेसचा रंग निळा असे. तेजसचे हे नुतनीकरण कपुरथला येथील कोच फॅक्टरी मध्ये करण्यात आले आहे. आता ही एक्स्प्रेस तीन नव्या मार्गांवर संचालित केली जाणार आहे.

२०१७ सालच्या मे महिन्यामध्ये रेल्वे विभागातर्फे मुंबई ते गोवा या मार्गवर तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा रंग निळा आहे. मात्र दिल्ली-चंडीगड आणि आनंद विहार-लखनऊ या मार्गांवर धावणार असलेल्या तेजस एक्स्प्रेसचे रूप मात्र नवे आहे. या नव्या ट्रेन्समध्ये फायर सेन्सर्स आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. या कॅमेरांच्या मदतीने संपूर्ण कोचमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर राहणार आहे.

या ट्रेनच्या प्रत्येक सीटवर एलइडी स्क्रीन्स लावण्यात आले आहेत. या स्क्रीन्सवर ‘ऑन डिमांड एन्टरटेनमेंट’ ची सुविधा यात्रेकरूंना देण्यात येणार आहे. तसेच यात्रेकरूंच्या सर्व गरजा पूर्ण करण्याकरिता या ट्रेनमध्ये अटेंडन्ट असणार आहेत. या कर्मचाऱ्यांना बोलाविण्यासाठी प्रत्येक सीटला खास बटनची सुविधा आहे. या ट्रेनमध्ये वाय-फायची सुविधा देण्यात येणार असून, मोड्युलर बायो टॉयलेट्स या ट्रेनमध्ये असणार आहेत. या ट्रेनच्या खिडक्यांना लावण्यात आलेले पडदे स्वयंचलित असून, हे उघडण्या-बंद करण्याकरिता बटन देण्यात आले आहे. तसेच या ट्रेनच्या दोन बोगींच्या मध्ये स्वयंचलित दरवाजे असून, त्यामुळे एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये येणे-जाणे सहज शक्य होणार आहे.

Leave a Comment