एलियन्स चीनला लवकरच भेट देणार का?


अगदी अलीकडच्या काळामध्ये चीनमध्ये मोठीच अजब घटना घडली. त्यावरून एलियन्स खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा नाही, या विषयावरच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. खरे तर एलियन्स अस्तित्वात आहेत किंवा नाहीत, यावर चर्चा गेले अनेक दशकांपासून होत आली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते एलियन्स अस्तित्वात असल्याचे सबळ पुरावेही उपलब्ध आहेत. ह्या प्रश्नाला परत एकदा चर्चेच्या झोतात आणणारी घटना, अगदी अलीकडच्या काळामध्ये चीनमधील चॉन्गक्विंग प्रांतामध्ये घडली, आणि अनेक नागरिकांनी ती प्रत्यक्षपणे पाहिली देखील आहे.

या प्रांतामध्ये राहत असलेल्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी आकाशामध्ये एक लखलखता, विचित्र प्रकाश पहिला. हा प्रकाश चंद्राचा किंवा विजांचा नसून, एखाद्या उडत्या तबकडीचा, म्हणजेच युएफओ चा असावा, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक नागरिकांनी या प्रकाशाचे व्हिडियो देखील आपल्या मोबाईल फोन्सवर चित्रित केले आहेत. सध्या ही चित्रीकरणे चीनमध्ये सोशल मिडियावर व्हायरल झाली असून, हा प्रकाश नक्की कोणता आहे यावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही तज्ञांच्या मते, एका रॉकेटने अंतराळामध्ये उड्डाण केल्याप्रमाणे हा प्रकाश असून, यामध्ये युएफओचा संबंध नाही.

‘वाईबो’ ही सोशल नेटवर्किंग वेबसाईट चीनमधील लोकप्रिय वेबसाईट असून, या वेबसाईटवर या प्रकाशाची अनेक छायाचित्रे आणि व्हिडीयोज प्रसिद्ध होत आहेत. या छायाचित्रांवर आणि व्हिडीयोजवर हजारो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींच्या मते ही उडती तबकडी जमिनीवर उतरणार असल्याप्रमाणे दिसत होती, तर काहींच्या मते या प्रकाशाच्या भोवती चंदेरी धुराची वलयेही नजरेस पडत होती. अनेकांनी अनेक प्रतिक्रिया आणि अनुभव सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त केले असले, तरी चीन सरकारच्या वतीने या घटनेवर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण अधिकृतरित्या अद्याप देण्यात आलेले नाही.

Leave a Comment