असेही एक आगळे वेगळे वॉटर पार्क


वॉटर पार्क मधली धमाल-मस्ती लहानांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी वाटते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये आणि इतरही सुट्ट्यांच्या वेळी वॉटर पार्क्स मध्ये लोकांची भरपूर गर्दी पहावयास मिळते. पण एक वॉटर पार्क मात्र आगळे वेगळे आहे. ह्या वॉटर पार्कची खासियत अशी, की ह्यामध्ये असणाऱ्या सर्व ‘राइड्स’ आणि खेळ, विकलांग लोकांना खेळता येतील अश्या तऱ्हेने बनविल्या गेल्या आहेत. खास विकलांग लोकांसाठी बनविले गेलेल्या या वॉटर पार्कमध्ये विकलांग लोक सर्व ‘राईड्स’चा मनसोक्त आनंद लुटू शकतात.

अमेरिकेतील टेक्सास मधील सॅन अँटोनियो मध्ये ‘मॉर्गन इन्स्पिरेशन आयलंड’ नामक हे वॉटर पार्क खास विकलांग लोकांकरिता बनविले गेले आहे. ह्या वॉटर पार्कचे संस्थापक हॉर्डन हार्टमन यांच्या म्हणण्यानुसार या वॉटरपार्क मध्ये इतर वॉटरपार्क्समध्ये पाहायला मिळते इतकी तुडुंब गर्दी पहावयास मिळत नाही. कारण हे वॉटरपार्क केवळ विकलांग लोकांसाठी बनविण्यात आले आहे. इथे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणाऱ्या व्यक्तींना ‘राईड्स ‘चा आनंद घेता येणार नाही. मात्र विकलांग मुलांसोबत आलेल्या त्यांच्या अभिभावाकांना या राईड्सचा आनंद आपल्या पाल्यांच्या सोबत घेता येईल.


विकलांग लोकांना पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेता यावा, याकरिता येथे वॉटर प्रुफ व्हीलचेअर देखील उपलब्ध आहेत. या व्हीलचेअरच्या बदल्यामध्ये कोणताही दर आकराला जात नाही. इतर वॉटर पार्क्स मध्ये सर्वच राईड्ससाठी लोकांची खूप गर्दी होत असल्याने, आणि अनेक राईड्स विकलांग लोकांना चढून बसता येण्यासारख्या नसल्यामुळे त्यांना या राईड्सचा आनंद लुटण्यापासून वंचित राहावे लागते. मात्र खास विकलांग लोकांसाठी असलेल्या या वॉटर पार्क मध्ये सर्व राईड्स विकलांग लोकांच्या गरजा आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाईन केल्या गेल्या असल्यामुळे या राईड्सचा आनंद, विकलांग व्यक्ती, विशेषतः लहान मुले, अगदी मनसोक्त लुटू शकतात.

Leave a Comment