ज्या रंगाची पगडी त्याच रंगाची गाडी वापरता ‘हे’ सरदारजी


इंग्लंडचे रहिवासी असणाऱ्या रुबेन सिंह यांची कहाणी अगदी आगळी वेगळी म्हणायला हवी. आजच्या काळातील इंग्लंडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी रुबेन सिंह हे एक व्यक्तिमत्व आहे. रुबेन सिंह हे मोठे व्यावसायिक असून इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. पण इतर श्रीमंत व्यक्ती आणि रुबेन सिंह ह्यांच्यामध्ये एक मोठा रोचक फरक आहे. विविधरंगी पगड्या आणि त्यांना साजेलश्या रंगांच्या अनेक आलिशान गाड्या ही रुबेन सिंह यांची खासियत आहे.

रुबेन सिंह यांच्याकडे जितक्या रंगांच्या पगड्या आहेत, तितक्याच रंगांच्या रोल्स रॉईस गाड्या आहेत. रोल्स रॉइस या गाड्या जगातील सर्वात अलिशान समजल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी आहेत. रोल्स रॉइसच्या एका गाडीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. रुबेन सिंह यांच्याकडे एकाच नाही, तर अनेक रोल्स रॉइस आहेत. तसेच या गाडीची अनेक मॉडेल्स त्यांच्याकडे आहेत. सर्वसाधारण माणसाच्या बाबतीत, एक रोल्स रॉइस खरेदी करणे, हे देखील केवळ स्वप्नातच घडू शकते. तसेच ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार ही गाडी डिझाईन केली जाऊ शकत असल्याने प्रत्येक गाडी खास असते. ही कार बनविण्याकरिता मशीन्सचा वापर न होता, ही संपूर्णपणे मानवनिर्मित असल्याने हीची किंमत कोट्यवधी रुपयांची असते. भारतामध्ये ही गाडी फार कमी लोकांच्या मालकीची आहे.

इंग्लंडमध्ये स्थायिक असेलेल्या रुबेन सिंह यांची, त्यांच्या पगडीवरून एका व्यक्तीने खिल्ली उडविली. ही गोष्ट रुबेन सिंह यांच्या मनाला लागली. त्यानंतर रुबेन सिंह यांनी व्यवसायामध्ये मोठे नाव मिळविले, आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांनी सर्वांच्या टीकेचे, खिल्लीचे चोख प्रत्युत्तर दिले. रुबेन सिंह यांनी भरपूर संपत्ती कमावलीच पण त्याचबरोबर जितक्या रंगांच्या पगड्या त्यांच्याकडे होत्या तितक्या रंगांच्या रोल्स रॉइस गाड्याही त्यांनी खरेदी केल्या. दर दिवशी ज्या रंगाची पगडी रुबेन सिंह धारण करतात, त्याच रंगाच्या रोल्स रॉइसमधून ते आपल्या दिवसभराच्या कामासाठी बाहेर पडतात. या रोल्स रॉईस गाड्यांच्या शिवाय देखील रुबेन सिंह यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत.