व्हॉट्सअॅपच्या फॉरवर्डला लागणार ब्रेक


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने फॉरवर्ड मेसेज हे फीचर आपल्या युझर्ससाठी आणले होते. मुळ मेसेज आणि फॉरवर्ड मेसेज यामधील फरक या फीचरमुळे ओळखणे सहज शक्य झाले. व्हॉट्सअॅपवर गेल्या काही महिन्यंपासून अफवा पसरवणाऱ्या मेसेजेसचे पेव फुटल्यामुळे व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारच्या अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरू नये आणि त्यातून अप्रिय घटना घडू नयेत म्हणून मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा कमी करण्याचा विचार व्हॉट्सअॅप करत आहे. जर व्हॉट्सअॅपने असे केले तर व्हॉट्सअॅप युजर्सना पाचपेक्षा जास्त वेळा एखादा मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही.

एखादा व्हिडिओ, फोटो किंवा संदेश आतापर्यंत मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करता यायचे. याचा फायदा होता तसाच तोटाही होता. पण व्हॉट्सअॅपवर सध्या तुफान वेगाने फॉरवर्ड होणाऱ्या याच मेसेजमुळे कित्येक अप्रिय घटना घडल्याचे समोर आल्यामुळे व्हॉट्स अॅपचा गैरवापर रोखण्याचा निर्णय व्हॉट्सअॅपने घेतला आहे. नव्याने ‘फॉरवर्ड मेसेज’या फीचरची चाचणी व्हॉट्सअॅप करत असून ही चाचणी पूर्ण झाल्यावर युजर्स व्हॉट्स अॅपवर आलेले मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाचपेक्षा जास्त व्यक्तींना फॉरवर्ड करू शकत नाही. पाच व्यक्तींना मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर फॉरवर्ड करण्याची मर्यादा संपेल आणि चॅटवरून forward button हा पर्याय नाहीसा होईल.

दरम्यान व्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने दुसऱ्यांदा नोटीस बजावली असून चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्यासाठी प्रभावी पावले उचलावी अन्यथा अफवा ज्या माध्यामातून पसरवल्या जात आहेत त्यांनाही दोषी मानले जाईल आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment