निराश करतो ‘धडक’चा क्लायमॅक्स


आज बॉक्स ऑफिसवर बहुचर्चित सैराटचा हिंदी रिमेक असलेला धडक रिलीज झाला आहे. ‘सैराट’मध्ये तारुण्यात प्रेमाची जादू कशी चढते आणि ते समाजासोबत कसा लढा देते अशीच कथा दाखवण्यात आली होती. त्याचप्रमाणे ‘धडक’मध्ये देखील ही कथा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. पण स्टार किड जान्हवीचा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या लोकांनी जास्त अपेक्षा घेऊन जाऊ नये. सैराट ज्या लोकांनी पाहिला असेल त्यांना वाटत असेल की, धडकचा शेवटही तसाच असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. चित्रपटाच्या क्लायमॅक्समुळे धडक चित्रपट सैराटपेक्षा वेगळा वाटतो.

‘धडक’ हा चित्रपट मराठी चित्रपट ‘सैराट’चा रिमेक असल्यामुळे चित्रपटातील जास्तीत जास्त गोष्टी सैराट प्रमाणेच असून ‘धडक’मध्ये हिंदी ऑडियन्सचा विचार करुन शशांक खेतानने कॉस्मॅटिक बदल केले आहेत. चित्रपटात प्रमुख भूमिकेत पार्थवी(जान्वही कपूर) आणि मधू(ईशान खट्टर) आहेत. आपल्या कॉलेजमध्ये एकत्र शिकणारी पार्थवी मधुला आवडते, मधु तिलाही आवडतो. मधु पार्थवीला मिळवण्यासाठी खुप मेहनत करतो. खुप श्रीमंत आणि पावरफुल कुटूंबातील पार्थवी असून तिचे वडील रतन सिंह (आशुतोष राणा) क्रूर आणि महत्त्वाकांक्षी नेता आहेत. तर मधु गरीब कुटूंबातून आहे. असे असूनही मधु आणि त्याचे कुटूंब पार्थवीचे मन जिंकून घेतात आणि मग सुरु होते दोघांची लव्ह स्टोरी. पण याविषयी लवकरच पार्थवीच्या कुटूंबाला कळते यामुळे ही क्यूट लव्हस्टोरी अडचणीत अडकते. पण दोघे तरीही हार न मानता एकमेकांसोबत शहरसोडून पळून जातात.

शशांक यांनी मुळ चित्रपट ‘सैराट’प्रमाणे एनर्जी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न ‘धडक’मध्ये केला असून धडकमधून प्रेमासाठी तरुण रक्तात असेलेली महत्त्वाकांक्षा स्पष्ट दिसते. परंतू ‘सैराट’ चित्रपटातील पावरफुल पॉइंट असलेला साधेपणा आणि निरागस प्रेम दाखवण्यात शशांक कुठेतरी कमी पडताना दिसतात. उदयपुर चित्रपटात खुप सुंदर दाखवण्यात आले आहे. पण आलीशान कोठ्यांचे दृष्य, कलरफुल साडी आणि विदेशी लोकांना दाखवणे गरजेचे वाटत नाही.

ईशान खट्टरने उत्कृष्ट अभिनय केला असून त्याच्या भूमिकेत तो पुर्णपणे सामिल झालेला दिसतो. अभिनयात ईशानने कुठलीही कसर सोडलेली नाही. ईशानचा धडक हा दूसरा चित्रपट आहे. त्याने या चित्रपटात दूस-यांदा त्याच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. जान्हवीचे स्ट्राँग कॅरेक्टर चित्रपटात आहे. तिने ते मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण राजस्थानी टच भूमिकेला देण्यात जान्हवी थोडी कमी पडली आहे. परंतू इंटरव्हलनंतर तिने आपल्या अभिनयाची भरपाई केली आहे. चित्रपटात ईशानचा मित्र बनलेला अंकित बिष्ट आणि श्रीधर वत्सने एक मित्र म्हणून उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. तर आपल्या भूमिकेला आशुतोष राणा यांनी पुर्ण न्याय दिला आहे. परंतू एकाच धाटणीच्या भूमिकेत ते अडकले आहे.

दरम्यान चित्रपटाचा क्लायमॅक्स पूर्णपणे निराश करतो. तुम्हाला सैराट चित्रपटाचा क्लायमॅक्स खुप शॉक्ड करतो. कदाचित याच कारणांमुळे शशांक ऑडियन्सला थिएटरपर्यंत आणू शकतात. चित्रपटाचे संगीत ओरिजनल चित्रपटातून घेण्यात आले आहे आणि ते शानदार आहे.