गुन्हा न करता भागवू शकता तुरुंगात जाण्याची हौस


सर्वसामान्यपणे तुरुंगवारी घडण्यासाठी एखादा गुन्हा करावा लागतो, परंतु केरळला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता गुन्हा न करताही तुरुंगात जाता येणार आहे. पर्यटकांना अनोखा अनुभव देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने हा नवीन उपक्रम राबविला आहे.

विशेष म्हणजे पर्यटकांना केवळ तुरुंगाला भेट देण्याची नव्हे, तर कैद्यांच्या वेषात राहून तुरुंगातील जेवणाचा अनुभवही या योजनेत घेता येणार आहे. एक विशिष्ट शुल्क देऊन राज्यातील कोणत्याही मध्यवर्ती तुरुंगात बंदी जीवनाचा अनुभव करण्यासाठी एक रात्र व एक दिवस तुरुंगात राहण्याची सोय सामान्य नागरिकांना देण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्याचा विचार राज्याचा कारागृह विभाग करत आहे. तृशूर जिल्ह्यातील विय्युर मध्यवर्ती तुरुंगाच्या जागेत एक अनोखे तुरुंग संग्रहालय सुरू करण्याची मूळ योजना असून त्याचा एक भाग म्हणून ‘पे अँड स्टे’ योजनेवर सरकार विचार करत आहे.

“प्रिझन म्युझियम प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही सरकारला सविस्तर प्रस्ताव दाखल केला आहे. तिला मंजुरी मिळाली तर ही योजना अंमलात येईल,“ असे राज्याच्या तुरुंग महासंचालक आर. श्रीलेखा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

तेलंगाणा राज्यात संगारेड्डी येथील तुरुंगात अशा प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदा राबविण्यात आला होता. मात्र केरळमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Comment