धोनीच्या संथ खेळीमुळे ‘गंभीर’ झाला गौतम


महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीवर भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामीवीर गौतम गंभीर याने प्रश्न उपस्थित केले आहेत. धोनीच्या इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील संथ खेळीवर गंभीरने टीका केली आहे. संघातील इतर फलंदाजांवर धोनीच्या संथ खेळीमुळे दडपण येत असल्याचे गंभीरने म्हटले आहे. तसेच धोनीच्या खेळीवर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही टीका केली आहे.

धोनी संथ फलंदाजी करत असल्यामुळे संघातील इतर फलंदाजांवर दबाव निर्माण होत आहे. धोनीला यापूर्वी कधी एवढी संथ खेळी करताना पाहिले नाही. सुरुवात जरी धोनीने संथ केली, तरी नंतर आक्रमक खेळी करत तो धावगती वाढवतो. पण त्याचा इंग्लंडविरुद्ध खेळ तसा नव्हता. जर तुम्ही सुरुवातीला चेंडू वाया घालवता तर अखेरपर्यंत फलंदाजी करण्याची जबाबदारीही तुम्हीच घ्यायला हवी, असे गंभीर म्हणाला.

दरम्यान धोनीच्या खेळीवर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही टीका केली आहे. धोनीला २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवायचे असल्यास कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे दादा म्हणाला. तसे नाही केले तर संघातील स्थान धोक्यात येऊ शकते, असेही गांगुली म्हणाला.

धोनीच्या अनुभवाची संघाला २०१९ च्या विश्वचषकामध्ये गरज आहे. पण त्याची कामगिरी त्याला सुधारण्याचीही गरज आहे. २५ षटके शिल्लक असताना फलंदाजीला येऊनही मोठी खेळी करणे कठीण जात असल्यामुळे संघाच्या हिताचे जे आहे त्याला अनुसरून निवड समितीने निर्णय घेतला पाहिजे, देशात गुणवान खेळाडूंची खाण असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.