बेजोसपेक्षा ५० पटीने अधिक श्रीमंत होता मुसा


आधुनिक इतिहासातील जगात सर्वात श्रीमंत म्हणून अमेझॉनचे जेफ बेजोस यांचा क्रमांक लागला असला तरी त्यांची संपत्ती मुसा नावाच्या इतिहासातील शासकापेक्षा ५० पटींनी कमीच असल्याचे आकडेवारी सांगते. ब्लुमबर्गच्या बिलिनिअर इंडेक्स प्रमाणे सोमवरी जेफ बेजोस यांची संपत्ती १५० अब्ज डॉलर्सच्या पलीकडे गेली आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. मात्र मालीचा शासक मुसा याची त्यावेळची संपत्ती साडेसात लाख कोटी डॉलर्स असावी असा अंदाज केला जातो.

कोण होता हा मुसा? टाईम मासिकाने २००९ साली इतिहासातील अति श्रीमंत व्यक्तींची एक यादी जाहीर केली होती. त्यात माली पश्चिम आफ्रिकेतील देशाचा शासक मुसा याचा पहिला क्रमांक होता. इतिहासातील सर्वाधिक श्रीमंतांच्या या यादीत बादशहा अकबर याचाही समावेश होता. मुसाच्या साम्राज्याचे नाव होते टिंबकटू. हा भाग जगातील सर्वाधिक सोने उत्पादक होता आणि शेकडो उंटावर लादून हे सोने नेले जात असे. या मुसाच्या अनेक कहाण्या मक्केत सांगितल्या जातात. त्याची राहणी इतकी राजेशाही होती कि त्यामुळे इजिप्त मध्ये चलन कल्लोळ निर्माण झाला होता.

या मुसाच्या पदरी दोन लाख सेना होती आणि त्यातील ४० हजार निशाणेबाज होते. या सेनेचा खर्च तो चालवीत असे आणि त्यावरून त्याच्या संपत्तीचा अंदाज बांधला गेला होता. अर्थात त्याची संपत्ती सोने स्वरुपात होती आणि त्या सोन्याची किंमत केली तर ती अंदाजे साडेसात लाख कोटी डॉलर्स इतकी भरली असती असे सांगितले जाते.

Leave a Comment