कसा आहे चिमुकला क्रोएशिया?


आजपर्यंत जगातील मोठ्या जनसंख्येला माहितही नसलेला पण रशियातील फिफा वर्ल्ड कप सामन्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला क्रोएशिया हा युरोपातला छोटा देश चांगलाच चर्चेत आला आहे. पहिल्याचा प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारून अवघ्या जगाच्या कौतुकास प्राप्त झालेला क्रोएशिया अवघा ५० लाख लोकसंख्येचा देश आहे. हा देश भारताच्या हिमाचल राज्याएवढा असला तरी अतीव सुंदर आहे.


येथे मोजकीच पर्यटन स्थळे आहेत मात्र त्यातील एक जागतिक वारसा यादीत सामील आहे. डबरोवनिक ओल्ड टाऊन वॉल हे ते ठिकाण. उंच उंच टॉवर आणि भोवती समुद्र असलेले हे स्थळ लोकप्रिय लोकेशन आहे. येथील हावर टाऊन मस्त सीफूड साठी प्रसिद्ध असून हा कार फ्री झोन आहे. त्यामुळे येथे वाहनाची गर्दी, हॉर्नचे कर्कश्य आवाज नाहीत. रस्त्यारस्त्यातून विविध चविष्ट पदार्थांचा दरवळ येथे येत असतो.

निसर्गप्रेमी असला तर येथील पिलट्विस नॅशनल पार्क ला आवर्जून भेट द्या. सुंदर धबधबे आणि अस्वले, लांडगे, घुबड असे विविध प्राणी पक्षी येथे पाहायला मिळतात. रोविन्झ हे फिशिंग हार्बर असून येथे सुपर मार्केट, आर्ट गॅलरी, अनेक रेस्टोरंट आहेतच पण नुसते भटकायला पण हे ठिकाण मस्त आहे.


जदर रोमनिस चर्च हे येथील प्रमुख धार्मिक स्थळ. ९ व्या शतकातील या चर्चचे पूर्वीचे नाव चर्च ऑफ डोनट्स असे होते. येथे काचेच्या नक्षीचे संग्रहालय प्रसिद्ध आहे.