१६० किलो सोन्याने आता आणखी चमकणार सुवर्ण मंदिर


शीख धर्मियांचे पवित्र आणि अतिमहत्वपूर्ण धर्मस्थान असलेल्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या सुवर्णजडीत घुमटांवर आता आणखी १६० किलो सोने चढविले जाणार आहे. ह्या सोन्याची किंमत पन्नास कोटी रुपये इतकी असल्याचे समजते. सुवर्ण मंदिरामध्ये जाण्यासाठी चार प्रवेशद्वारे ( देवडी ) आहेत. ह्या चारही प्रवेशद्वारांवर घुमट आहेत. ह्या चारही घुमटांवर हे सोने चढविले जाणार आहे. त्याशिवाय सुवर्ण मंदिरामध्ये असलेल्या मोठ्या तलावाच्या मधोमध सुवर्णजडित हरमंदिर साहेब गुरुद्वारा आहे. ह्या गुरुद्वाराच्या घुमटावर तसेच येथे असलेल्या अकाल तख्ताच्या घुमटावर देखील सोने चढविले जाणार असल्याचे समजते.

सुवर्णमंदिर हे शीखांचे प्रार्थनास्थळ सर्व धर्मियांसाठी सदैव खुले असते. ह्या मंदिराच्या प्रत्येक देवडीवरील घुमटांवर एकूण चाळीस किलो सोने चढविले जाणार असून, ह्या पैकी मुख्य देवडीवर सोन्याचा पत्रा चढविण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम कार-सेवेच्या मार्फत सुरु आहे, म्हणजेच स्वयंसेवकांच्या द्वारे हे कार्य पार पाडले जात आहे. मुख्य देवडी वरील घुमटाचे काम पूर्ण झाल्यानंतर अन्य ठिकाणचे काम हाती घेतले जाणार असल्याचे मंदिराच्या व्यवस्थापनाद्वारे सांगण्यात आले.

१९२ वर्षांपूर्वी महाराजा रणजीत सिंह ह्या शीख राज्यकर्त्याने १६.३९ लाख रुपये मंदिराला ‘सोने दि सेवा’ , म्हणजेच सुवर्णदान म्हणून दिल्यानंतर मोहम्मद खान ह्या कारागिराने ह्या प्रार्थनास्थळावर सोन्याचा पत्रा चढविण्याचे काम सुरु केले. महाराजा रणजीत सिंह ह्यांच्या नंतर त्यांच्या राण्या आणि त्याच्या अनेक वंशजांनी ही मंदिरासाठी पुष्कळ दानधर्म केले. त्याकाळी मंदिरावर सुवर्णपत्र चढविण्यासाठी ६४.११ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. १९८४ सालच्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतर सुवर्ण मंदिराच्या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. ह्याची जबाबदारी अनेक शीख संघटनांनी घेतली. तेव्हा इंग्लंडमधील शीख संघटनेने मंदिरावरील सोन्याच्या पत्र्यांचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी पेलली होती. हे काम १९९५ साली सुरु झाले आणि १९९९ संपले.

सुवर्ण मंदिराच्या मुख्य देवडीवरील घुमट आकाराने मोठे असून, बाकी देवड्यांचे घुमट आकराने थोडे लहान आहेत. ह्या देवड्यांवरील घुमटांवर मूळ तांब्याचे पत्रे असून, त्यावर सोन्याचे पत्रे चढविले गेले आहेत. आता ह्या घुमटांवर पुन्हा नवे सोन्याचे पत्रे चढविले जाणार आहेत, आणि त्यासाठी चाळीस ते पन्नास किलो सोन्याचा वापर केला जाणार असल्याचे समजते. ह्या कामी येणारा खर्च भाविकांनी दान केलेल्या धनातून केला जाणार आहे.

Leave a Comment