लवकरच बाजारात दाखल होणार १०० रुपयांची नवी नोट


नवी दिल्ली – लवकरच शंभर रुपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणार असल्यामुळे आता लवकरच भारतीय नागरिकांना २००, ५००, २००० नंतर १०० रुपयांची नवी नोट वापरता येणार आहे. १०० रुपयांच्या या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा असणार आहे. गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीची (बावडी) झलक या नोटेमध्ये दिसणार आहे. जुन्या शंभर रुपयाच्या नोटेपेक्षा या नोटेचा आकार कमी आहे.

शंभर रुपयांची नवीन नोट रिझर्व्ह बँकेकडून बाजारात येत आहे. पण शंभर रुपयांची जुनी नोटही चलनात असणार आहे. या नोटेची छपाई देवास येथील मुद्रण छपाई केंद्रात सुरु झाली असून २ हजार रुपयांच्या नोटेचे म्हैसूर येथील ज्या प्रिटींग प्रेसमध्ये डिजाईन बनविण्यात आले होते. त्याच, प्रिंटिंग प्रेसमध्ये या १०० रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नोटेसाठी वापरण्यात आलेला कागद आणि शाई ही स्वदेशी आहे. साधारणत: ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या नोटा चलनात येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment