अँड्रॉईडमार्फत एकाधिकाराचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुगलला २० हजार कोटींचा दंड !


ब्रुसेल्स- अँड्रॉईडमार्फत एकाधिकाराचा दुरुपयोग केल्याप्रकरणी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलकडून तब्बल २० हजार कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो. ही कारवाई गुगल कंपनीवर या आठवड्यात केली जाऊ शकते. मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गुगल आपले अँड्रॉईड सॉफ्टवेअर मोफत देते, पण गुगल त्या बदल्यात वेब ब्राउझर व सर्च इंजिनसारखे अॅप इन्स्टॉल करण्याची सक्ती करते, असा गुगलवर आरोप आहे.

अँड्रॉईड फोनचा युरोपच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये जवळपास ७५ टक्के हिस्सा असून या कंपन्यांनी तक्रार केली होती की, आम्हाला गुगलच्या दबावामुळे गुगल सोडून दुसऱ्या कंपन्यांचे सर्च इंजिन व ब्राउझर्सचा वापर करता येत नाही. गुगलने या आरोपाचे खंडन करताना आमच्याकडून फोन उत्पादकांवर दबाव नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

मागील तीन वर्षांपासून या प्रकरणाची युरोपातील प्रतिस्पर्धी आयोगाचे प्रमुख मार्गारेट वेस्टेजर हे चौकशी करत होते. या आयोगाला वार्षिक उलाढालीच्या १० % दंड लावण्याचा अधिकार आहे. त्यानुसार हा दंड ठोठावला जाऊ शकतो.

Leave a Comment