खुशाल खा दुधाचे पदार्थ, हृदयासाठी निर्धोकच – शास्त्रज्ञांचा दावा


शुद्ध दुधापासून बनलेल्या पनीर , लोणी किंवा तूप अशा पदार्थांपासून किंवा चरबीयुक्त दुधामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढत नाही, असे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. दुधाचे पदार्थ आणि हृदयविकारामुळे होणारे मृत्यू यांच्यामध्ये कुठलाही संबंध नसल्याचे या शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

उलट ही चरबी गंभीर स्वरूपाच्या हृदयाघातापासून सुरक्षा पुरविते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. “दुग्धजन्य चरबीमुळे वयस्कर व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याचा किंवा लवकर मृत्यू होण्याचा धोका वाढत नाही, हे आमच्या संशोधनातून दिसून येते. सर्वसामान्य समजुतीच्या हे नेमके उलट आहे. मृत्यूस चालना न देण्याव्यतिरिक्त, यातील निष्कर्ष असे सुचवितात दुग्धजन्य पदार्थांत आढळून येणाऱ्या एका फॅटी ऍसिडमुळे हृदयाघात आणि अन्य होणाऱ्या आजाराचा धोका कमी होतो,” असे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास सहायक प्राध्यापक मार्सिया ओटो यांनी सांगितले.

या संशोधनात दुग्धजन्य चरबीमध्ये असलेल्या चरबीयुक्त आम्ल (फॅटी एसिड) आणि हृदयविकार किंवा मृत्युच्या कारणांचा संबंध शोधण्यासाठी अनेक बायोमार्करचे अध्ययन करण्यात आले. हे संशोधन 22 वर्षे चालले होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशन या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.