प्राचीन ऐतिहासिक शहर चंदेरी


मध्यप्रदेशातील मालवा आणि बुंदेलखंड यांच्या सीमेवर असलेले चंदेरी हे शहर ऐतिहासिक शहर असून ११ व्या शतकातील प्रमुख व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध होते. अशोकनगर जिल्ह्यातील या शहरावर गुप्त, प्रतिहार, गुलाम, तुघलक, खिलजी, घोरी, अफगाण, राजपूत आणि सिंदिया वंशीयांनी राज्य केले होते. राणा संग याने मोम्हम्मद खिलाजीकडून हे शहर जिंकून घेतले होते त्यावेळी बाबर हिंदुस्थानचा सम्राट होता.


या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत तसेच हे शहर तलम, अतिशय सुंदर अश्या चंदेरी कापडासाठी जगप्रसिद्ध आहे. येथे ९ व्या, १० व्या शतकातील अनेक सुंदर जैन मंदिरे आहेत. बुंदेला राजपुतांनी बांधलेला चंदेरी किल्ला हे येथले मुख्य आकर्षण. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला खुनी दरवाजा असे म्हटले जाते. तसेच बुंदेला कालखंडातील परमेश्वर सरोवर आणि त्याजवळ असलेले लक्ष्मण मंदिर आवर्जून पाहवे असेच. खिलजीचा कोशक महाल हे आणखी एक स्थळ. चंदेरी पासून ४५ किमीवर इसागढ येथेही अनेक सुंदर मंदिरे असून ती १० व्या शतकातील आहेत. मध्यप्रदेशातील सर्वात मोठी जामा मशीद चंदेरीमध्ये आहे. २५ किमीवर असलेल्या देवगढ येथेही अनेक जैन मंदिरे आहेत.


येथे सुमारे ७०० वर्षे चंदेरी साड्या विणल्या जात असून दुसऱ्या शतकापासून हे ठिकाण विणकरांचे केंद्र म्हणून जगप्रसिद्ध आहे. चंदेरी साड्या, ड्रेस मटेरीअल अत्यंत सुंदर, तलम आणि नाजूक कलाकारीचे असते. सिल्क, कॉटन आणि सिल्क कॉटन अश्या प्रकारात हे कापड विणले जाते. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरूण धवन यांच्या सुई धागा चित्रपटाचे चित्रण या शहरात केले गेले आहे.

Leave a Comment