जुन्या पायमोज्यांचा करा असाही वापर


घरामधले कपड्यांचे कपाट आवरताना जोडी हरविलेले पायमोजे अनेकदा आपल्याला सापडतात. असे जोडी नसलेले पायमोजे पायामध्ये घालण्यासाठी वापरता येत नाहीत. त्यामुळे ते तसेच ठेऊन देणे किंवा फेकून देणे ह्यापलीकडे इतर कोणते पर्याय आपल्यासमोर उरत नाहीत. पण अश्या वेळी हे पायमोजे टाकून न देता अनेक प्रकारे उपयोगामध्ये आणता येतील.

पायमोजाचा वापर स्वयंपाकघरातील ओटा, कॅबिनेट् पुसून काढण्यासाठी करता येईल. मोज्यांचा कपडा नरम असल्याने काचेच्या वस्तू कोरड्या पुसण्याकरीता किंवा फर्निचर पुसण्याकरीता हा मोजा उपयोगामध्ये आणता येऊ शकतो. ह्या मोज्याचा वापर खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी ही करता येईल. थोड्याशा साबणाच्या पाण्यामध्ये मोजा बुडवून काच पुसून घ्यावी, आणि त्यानंतर वर्तमानपत्राच्या कोरड्या कागदाने काच पुसून घ्यावी. काच एकदम स्वछ होईल.

जर हातापायांचे स्नायू दुखत असतील, तर मोज्याचे रुपांतर दुखऱ्या स्नायूंना शेक देणाऱ्या हिटिंग पॅडप्रमाणे करता येऊ शकेल. ह्यासाठी मोज्यामध्ये थोडे तांदूळ भरावेत आणि हा मोजा त्यातील तांदुळासकट मायक्रोवेव्ह मध्ये दोन ते तीन मिनिटे गरम करावा. मोज्याच्या आतील तांदूळ गरम झाल्याने मोज्याचा वापर हिटिंग पॅड प्रमाणे करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे शरीरावर कुठेतरी मार लागल्याने सूज आली असल्यास तिथे बर्फ लावण्याचा सल्ला दिला जातो. पण बर्फ कधीही थेट त्वचेवर लावू नये. त्याऐवजी पायमोज्यामध्ये बर्फ घालून घेऊन आईस पॅक प्रमाणे त्याचा वापर करीत बर्फाचा शेक घ्यावा.

लहान मुलांकडे अनेक बोर्ड गेम्स असतात. ह्याच्या सोंगट्या किंवा ‘ जिगसॉ पझल्स’ चे भाग मोज्यांमध्ये भरून ठेवल्याने ते हरविण्याची शक्यता कमी असते. तसेच लहान मुले घरामध्ये चॉक बोर्ड किंवा फळा / व्हाईट बोर्ड वापरत असल्यास ते पुसण्यासाठीही डस्टर ऐवजी मोज्यांचा वापर केला जाऊ शकतो.