वीकेंडला संध्याकाळी पाचनंतर भुशी डॅमकडे जाणारा रस्ता बंद


पुणे : पावसाळी वीकेंड म्हटला, की लोणावळ्यातील भुशी डॅम तर एकदम हॉट डेस्टिनेशन असल्यामुळे पर्यटकांची पावले आपसूकच डॅमकडे वळतात आणि त्यामुळे भुशी डॅमकडे जाणारा रस्ता गर्दी टाळण्यासाठी शनिवार-रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे.

शनिवार-रविवार आणि सलग सुट्टयांच्या काळात भुशी धरण आणि लायन्स पॉईंट परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होते. या भागात त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणासाठी भुशी डॅम आणि लायन्स पॉईंटकडे जाणारा मार्ग संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुमारे पाच ते सहा किमी अंतरापर्यंत भुशी धरण आणि लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक जाम असतो. त्यामुळे तास-तासभर पर्यटकांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. या परिसरात पायी येणाऱ्या पर्यटकांनाही रस्त्यावरुन चालणे कठीण होते. ट्रक, टेम्पो, बस, मिनी बस यासारख्या अवजड वाहनांना दरवर्षीप्रमाणेच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसात शहरात प्रवेश बंदी असेल.

हा निर्णय पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच घेण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भुशी धरण आणि लायन्स पॉईंटसह भाजे, लोहगड, गिधाड तलाव ही सर्व पर्यटनस्थळंही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पर्यटकांसाठी बंद केली जाणार आहेत. पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी वर्षासहलीचा आनंद घेताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. महिलांची छेडछाड, अश्लील शेरेबाजी, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी, धांगडधिंगा, मद्यपान किंवा हुक्का ओढताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

Leave a Comment