आवळ्याचे तेल आणि त्याचे फायदे


आयुर्वेदामध्ये आवळ्याला औषधी मानले गेले आहे. आवळा हा आपले केस, त्वचा आणि शरीराच्या एकंदर आरोग्याकरिता अतिशय लाभकारी आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर बळकट बनविण्यासही आवळा सहायक आहे. ह्याच्या सेवनाने जितका फायदा शरीराला होतो, तितकाच फायदा ह्यापासून तयार केल्या गेलेल्या तेलानेही होतो. आवळ्याचे तेल बाजारमध्येही मिळत असले, तरी त्यामध्ये अन्य रसायनेही मिसळली असण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात मिळणारे आवळा तेल आणण्यापेक्षा हे तेल घरच्याघरी बनवून पूर्णपणे शुध्द तेलाचा लाभ घेता येऊ शकतो.

आवळ्याचे तेल घरी बनविण्यासाठी सर्वात आधी आवळे चिरून त्याचा गर मिक्सरवर बारीक वाटून, ही पेस्ट नारळाच्या तेलामध्ये घालावी आणि हे मिश्रण घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये आठवडाभर बंद करून ठेवावे. आठवड्याभरानंतर हे तेलाचे मिश्रण गाळून घेऊन एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवावे. अश्या रीतीने आवळ्याचे तेल वापरण्यास तयार होईल. हे तेल वापरण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस हे तेल केसांना लावावे. हे तेल लाऊन केसांच्या मुळांशी काही मिनिटे मसाज करावा. त्यामुळे हे तेल केसांच्या मुळांशी जिरण्यास मदत होईल. तेल लावल्यानंतर ते केसांवर साधारण पाऊण तास राहू द्यावे, व त्यानंतर केस नेहमीप्रमाणे धुवून टाकवेत.

आवळ्याच्या तेलामध्ये कॅल्शियम, क जीवनसत्व, लोह आणि फॉस्फोरस असते. ही सर्व तत्वे केसांच्या मुळांना बळकटी देणारी आहेत. तसेच हे घटक केसांना पांढरे होण्यापासूनही रोखणारे आहेत. ह्या तेलामुळे केसांना चांगली चमक येऊन केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे केसांमधील कोंडाही नाहीसा होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment