पुण्यातील धमाल स्ट्रीट शॉपिंगची ठिकाणे


पुणे तेथे काय उणे अशी एक म्हण आहे. पुणे हे सर्वांगसुंदर शहर आहे. मस्त हवा, अनेक ऐतिहासिक ठिकाणे, रस्त्यारस्त्यावर खादडीच्या असंख्य टपऱ्या, हॉटेले, रेस्टोरंट, अनेक महाविद्यालये असल्याने रस्त्यांवर मुक्त हिंडणारी तरुणाई हि पुण्याची प्रेक्षणीय स्थळे मानता येतील. त्यात आणखी एक उत्साह देणारी कृती म्हणजे पुण्यामधले स्ट्रीट शॉपिंग. पुण्यात असल्या खरेदीसाठी अनेक बाजार असले तरी त्यातील काही खूपच प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही कमी किमतीत हवे ते शॉपिंग बिनधास्त करू शकता. बार्गेन म्हणजे घासाघीस करण्यात तुम्ही कुशल असाल तर हि खरेदी आणखी मजेदार बनू शकते.

पुण्याच्या मध्यवस्तीत असलेली तुळशीबाग हा फार जुना बाजार आहे. मंडई पासून अगदी जवळ असलेला हा बाजार प्रमुख्याने गृहपयोगी वस्तूंचा बाजार असला तर कालानुरूप येथे इमिटेशन ज्युवेलरी पासून कपडे, चपला, पर्स, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारच्या बांगड्या आणि घरात उपयुक्त सर्व प्रकारची भांडीकुंडी, आरसे मिळतात. या बाजारात नेहमीच खूप गर्दी असते आणि येथे घासाघीस करता येते.

फॅशन स्ट्रीट- पुण्याच्या कॅम्प भागात रस्त्यावर लागणारा हा बाजार. सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे, पर्सेस, विविध फॅशनचे जोडे, ज्युवेलरीसाठी हा बाजार प्रसिद्ध असून येथे आपल्याला हव्या त्या किमतीत वस्तू मिळू शकतात. येथेही खरेदी करताना बार्गेनिंग जरूर करावे.

फर्गसन रोड – अनेक प्रसिद्ध दक्षिणात्य हॉटेलप्रमाणेच हा रस्ता शॉपिंग साठीही ओळखला जातो. येथे प्रामुख्याने तरुणाईला आवडतील अश्या वस्तू मिळतात. कॉलेज गोइंगची प्रामुख्याने येथे गर्दी असते आणि लेटेस्ट फॅशनचे कपडे, चपला, पर्सेस, गॉगल्स अशा अनेकविध वस्तू येथे स्वस्तात खरेदी करता येतात. या शिवाय येथे जुन्या पुस्तकांचे स्टॉल आहेत तसेच खादडी साठी अनेक टपऱ्या आणि मोठी रेस्टोरंट आहेतच.

हाँगकाँग लेन –पुण्याच्या डेक्कन भागातली हि गल्ली खरेदीसाठी प्रसिद्ध असून येथेही अनेक प्रकारच्या वस्तू मिळतात. कपडे, पर्सेस, बॅग्ज बरोबर घड्याळे, मोबाईल, अक्सेसरीज विकणारी दुकाने येथे आहेत. येथे इम्पोर्टेड मालासाठी प्रामुख्याने गर्दी होते. इम्पोर्टेड सेंट्स, घड्याळे, शूज अश्या अनेक वस्तू येथे मिळतात. येथेही बार्गेनिंग करता येते.

जुना बाजार- जुना बाजार हे पुण्याचे खास आकर्षण आहे. दर बुधवारी आणि रविवारी हा बाजार भरतो. शनिवार वाड्यापासून जवळ हा बाजार लागतो आणि येथे फर्निचर, प्रवासी बॅग, लोखंडी समान, शेती अवजारे, घरगुती वापराच्या वस्तू, घड्याळे, कपडे याचबरोबर जुनी नाणी, जुन्या मूर्ती, जुने सामान विकले जाते. याला चोर बाजार असेही म्हणतात मात्र हा त्या अर्थाने चोर बाजार नाही. एकदा तरी या बाजारात आवर्जून चक्कर मारलीच पाहिजे असा हा मस्त बाजार आहे.

Leave a Comment