अखेर ६६ वर्षांनी नखे कापणार श्रीधर चिल्लाल


न्यूयॉर्क- गेली ६६ वर्षे भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने नखे कापलेली नाहीत. पण आता त्यांनी आपली नखे कापण्याचा निर्णय घेतला असून या गृहस्थांचे नाव श्रीधर चिल्लाल असे आहे. त्यांचे आता वय ८२ वर्षे असून ६६ वर्षे त्यांनी नखे वाढवली असून त्यांच्या नावावर जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम आहे.

गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चिल्लाल यांचे नाव नोंदले गेले आहे, १९५२ साली त्यांनी नखे कापणे सोडून दिळे होते. आता त्यांनी साडेसहा दशकांच्या काळानंतर नखे कापण्याचा निर्णय घेतला आहे. ते न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे नखे कापणार असून एका जाहीर कार्यक्रमाचे त्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या सर्व नखांची एकूण लांबी ९०९.६ सें.मी असावी. त्यांच्या अंगठ्याचे नख सर्वात लांब असून ते १९७.८ सें.मी एवढे आहे. एकाच हाताची सर्वात लांब वाढलेली नखे अशा उल्लेखासह २०१६ मध्ये त्यांचे नाव गिनिज बूकात नोंदले गेले. चिल्लाल हे मूळचे पुण्याचे असून रिप्लेज संग्रहालयातर्फे त्यांना नखे कापण्याची विनंती करण्यात आली असून ती कापल्यानंतर संग्रहालयात ठेवण्यात येतील. सध्या चिल्लाल हे त्यासाठीच अमेरिकेत गेले आहेत.