एकेकाळी सिमकार्ड विकणारी ‘मिसेस युनायटेड नेशन’ स्‍पर्धेत करणार आशियाचे प्रतिनिधीत्‍व


पुणे – जमैका येथे २१ जुलै रोजी होणा-या ‘मिसेस युनायटेड नेशन’ स्‍पर्धेत पुण्‍याची श्रद्धा कक्‍कड आशियाचे प्रतिनिधीत्‍व करणार आहे. तिने २०१७मध्‍ये ‘मिसेस आशिया यूनायटेड नेशन’ हा किताब आपल्‍या नावावर केला होता. एक यशस्‍वी इंटेरिअर डिझाईनर असलेल्‍या श्रद्धाचा येथपर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय आहे.

श्रद्धाचा जन्‍म नाशिकच्‍या एका श्रीमंत व्‍यवसायिक कुटुंबात झाला. नाशिकमध्येच तिचे शालेय शिक्षण पुर्ण झाले. वडील मोहन कसार यांची एक यशस्‍वी उद्योजक म्‍हणून सर्वत्र ओळख असल्यामुळे त्‍यांना सुरूवातीला पैशाची कोणतीही चणचण भासली नाही. पण काही काळानंतर वडीलांचा व्‍यवसाय पुर्ण बुडाला आणि तो इतका बुडाला की, त्‍यांच्‍याकडे श्रद्धाच्‍या शालेय शिक्षणासाठीही पैसे नव्‍हते. श्रद्धा तेव्‍हा केवळ १६ वर्षांची होती. तिने या अडचणीच्‍या काळात आपला शाळेचा खर्च भागवण्‍यासाठी व कुटुंबीयांना मदत करण्‍यासाठी नाशिकमध्‍ये सिमकार्ड विकण्‍याचे काम केले होते.

श्रद्धाने सांगितले की, कुटुंबाच्‍या हलाखीच्‍या परिस्थितीमध्‍ये माझ्या शिक्षणाचा खर्च मीच उचलण्‍याचे ठरवले होते. त्‍यामुळे पुण्‍यात सिंहकड इन्सिट्युटमध्‍ये इंटेरिअर डिझायनिंगच्‍या कोर्सला प्रवेश घेतल्‍यानंतर मी दिवसा अभ्‍यास तर संध्‍याकाळी आयसीआयसीआय बँकेत लोन विभागात काम करायचे. तेव्‍हा पैसे फार कमी मिळायचे. कसाबसा मला आपला खर्च भागवावा लागत असे.

श्रद्धाने पुण्‍यात अभ्‍यास करताना २००५मध्‍ये ‘मिस पुणे’ या स्‍पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्‍ये ती फर्स्‍ट रनरअप होती. यानंतर तिला मॉडेलिंगचे छोटछोटे काम आणि चित्रपटांच्‍या ऑफर येऊ लागल्‍या. श्रद्धाने शिक्षण पुर्ण झाल्‍यानंतर कॉमर्स ग्रॅज्‍युएट इंटेरिअर डिझायनिंगची स्‍वत:ची कंपनी सुरू केली. तिला यामध्‍ये चांगलेच यश मिळाले. तिची ओळख याचदरम्‍यान पुण्‍याचे व्‍यवसायिक देवन कक्‍कड यांच्‍याशी झाली. २०११ मध्‍ये दोघांनी विवाह केला. त्‍यांना आता एक मुलगाही आहे. तो जवळपास साडेतीन वर्षांचा आहे. श्रद्धाने सांगितले की, कुटुंबाच्‍या पाठिंब्‍यामुळेच मी अजूनही फॅशन जगतात काम करत आहे. सामाजिक कार्यातही श्रद्धाचा स‍क्रीय सहभाग आहे. पुण्‍यातील अनाथालय आणि वृद्धाश्रमांमध्‍ये ती अनेकदा वेळ घालवते.