या विशिष्ट धर्मस्थळी बोलले जातात हे नवस


भारतामध्ये अनेक धार्मिक स्थळे अशी आहेत, जिथे जाऊन भाविक अत्यंत श्रद्धेने आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून नवसायास करीत असतात. भाविकांनी केलेले हे नवस पूर्ण होतातही. हे नवस बोलताना अनेक ठिकाणी एखादी ठराविक वस्तू त्या धर्मस्थळी ठेऊन किंवा दान करून नवस मागण्याची पद्धत रूढ आहे. ह्याच परंपरेला अनुसरून पंजाबमधील एका गुरुद्वारामध्ये नवस मागण्यासाठी खेळणी दान करून नवस बोलण्याची पद्धत आहे. ज्यांना परदेशी जाण्याची संधी मिळावी अशी इच्छा असेल, अश्या व्यक्ती येथे येऊन खेळणी दान करतात आणि नवस बोलतात.

पंजाबच्या दोआबा प्रांतातील तल्हान गावामध्ये असलेला हा गुरुद्वारा शहीद बाबा निहालसिंह ह्यांना समर्पित आहे. ह्या गुरुद्वारामध्ये एखादे खेळणे चढवून जो मनोभावे नवस बोलतो, त्याची मनोकामना बाबा निहालसिंह ह्यांच्या कृपेने अवश्य पूर्ण होते असे म्हणतात. तसेच ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा असते, असे भाविक येथे खेळण्यातील विमाने ठेऊन तसा नवस बोलतात. भाविकांना मंदिरामध्ये दान करण्याकरिता खेळणी सहज उपलब्ध व्हावीत ह्याकरिता ह्या गुरुद्वाराच्या परिसरामध्येच अनेक खेळण्यांची दुकाने सजलेली दिसतात.

हैदराबादच्या जवळील मेहदीपटनम् पासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिलकुर बालाजी मंदिराला ‘व्हिजा मंदिर’ असे ही म्हटले जाते. हे मंदिर आठवड्यातून केवळ तीन दिवस भाविकांसाठी खुले होत असून, येथे भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. विदेशी जाण्यासाठी विनासायास व्हिजा मिळावा ह्यासाठी प्रार्थना करण्यासाठी भाविक येथे येतात. तसेच ज्याची प्रार्थना फळते, तो भाविक मंदिराच्या गाभाऱ्याला १०८ प्रदक्षिणा घालून आपला नवस फेडतो. हे मंदिर हैदराबाद परिसरातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून, ह्या मंदिराच्या मालकी हक्कांवरून राज्य सरकार आणि स्थानिक निवासी ह्यांच्यामध्ये काही काळापासून वाद सुरु आहेत. ह्या मंदिरामध्ये दानपात्र नाही. केवळ गाड्या पार्क करण्यासाठी येथे ठराविक दर आकारला जातो, आणि त्या जमा झालेल्या पैशातून मंदिराचा सर्व खर्च चालविला जात असतो.

गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या, कानपूर येथील रॉबी शर्मा ह्यांनी ‘भ्रष्ट तंत्र विनाशक शनी मंदिर’ ह्या नावाने शनी मंदिराची स्थापना केली आहे. भारतामध्ये भ्रष्टाचार अतिशय वाढलेला असून आता केवळ दैवी हस्तक्षेपानेच तो संपुष्टात येऊ शकतो असे शर्मा म्हणतात. ह्याच कारणासाठी त्यांनी ह्या शनी मंदिराची स्थापना केली असल्याचे समजते. कल्याणपूर येथे असलेल्या ह्या मंदिरामध्ये फळे, फुले, प्रसाद इत्यादी आणण्यास मनाई आहे. तसेच भ्रष्टाचाराला कारणीभूत राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी ही सर्व मंडळी असून, त्यांना ह्या मंदिरामध्ये प्रवेशास मनाई असल्याचे शर्मा म्हणतात.

Leave a Comment