लाखो तरुणींचा प्रेमभंग; लवकरच विवाहबद्ध होणार जस्टीन बीबर


केवळ चोवीस वर्षे वयाच्या कॅनेडीयन पॉप स्टार जस्टीन बीबरने इतक्या लहान वयामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळविली आहे. अनेक तरुणी ह्या पॉप स्टारच्या दिवाण्या आहेत, हे साहाजिक आहे. ह्या लाखो तरुणींची ‘दिल की धडकन’ असलेल्या जस्टीनने आता विवाह करण्याचा निर्णय घेतला असून, हेली बॉल्डविन हिच्याशी जस्टीन लवकरच विवाहबद्ध होणार आहे. ह्या दोघांची एन्गेजमेंट नुकतीच पार पडली असून, जस्टीनने बहामाज मधील एका सुंदर रिसोर्टवर सुट्टी साठी गेलेले असताना हेलीला लग्नासाठी विचारले. हेलीनेही जस्टीनच्या प्रस्तावाला आनंदाने होकार दिल्याचे वृत्त ‘टीएमझेड’ नामक वेबसाईटने दिले आहे. इतर वृत्तवाहिन्यांनीही ह्या वृताला दुजोरा दिला आहे.

बिबरचे वडील जेरेमी ह्यांनी ही आपल्या मुलाच्या आनंदामध्ये आपण सहभागी असून, त्याच्या आगामी आयुष्यामध्ये घडणाऱ्या आनंददायी घटनांची आपण उत्साहाने वाट पहात असल्याचे म्हटले आहे. बीबरच्या आईने देखील ट्वीटर वर पोस्ट द्वारे आपला आनंद जाहीर केला. हेलीला भेटण्यापूर्वी जस्टीन बिबर आणि सेलेना गोमेझ ह्यांचे प्रेमप्रकरण पुष्कळ काळ चर्चेत होते. मात्र हे दोघे काही काळाने वेगळे झाल्यानंतर जस्टीन आणि हेलीची भेट झाली. हळू हळू त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि कालांतराने ह्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

हेली बॉल्डविन अनेक टीव्ही शो, म्युझिक व्हीडोयो आणि जाहिरातींमध्ये झळकली आहे. त्याशिवाय व्होग, मेरी क्लेअर आणि हार्पर्स बझार सारख्या प्रसिद्ध फॅशन मॅगझिन्सच्या फ्रंट कव्हरवरही हेलीची छायाचित्रे झळकली आहेत. हेली, अभिनेता-निर्माता स्टीफन बॉल्डविन ह्यांची मुलगी आहे. तसेच सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता अॅलेक बॉल्डविन हेलीचे काका आहेत.