आता औषधे खरेदी करताना लक्षात घ्यावे लागणार हे नियम


आगामी काळामध्ये औषधे खरेदी करताना आता काही नवे नियम लवकरच लागू करण्यात येणार असून, हे नियम ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहेत. ह्या नियमांच्या अंतर्गत आता अनेक औषधे ग्राहकांना कमी दरामध्ये उपलब्ध होऊ शकणार आहेत. पण त्यासाठी ग्राहकांना हे नवे नियम माहित असणे अगत्याचे आहे, नाही तर त्याच औषधांच्या करिता ग्राकाहांना विनाकारण जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

येत्या काही काळामध्ये अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या नव्या नियमावलीच्या अंतर्गत आता देशभरातील सर्व औषधांच्या दुकानांमध्ये जेनेरिक औषधांसाठी वेगळा काऊंटर बनविला जाणे बंधनकारक असणार आहे. तसेच जेनेरिक औषधे उपलब्ध असणाऱ्या काऊंटरवर तशी स्पष्ट सूचना लिहिणेही बंधनकारक असणार आहे, जेणेकरून ग्राहकांना ह्याची माहिती होऊ शकेल. ह्या काऊंटर वर केवळ जेनेरिक औषधांची विक्री केली जाईल. येथील औषधेही ग्राहकांना सहज दृष्टीस पडतील अश्या रीतीने मांडून ठेवली जातील. केंद्र सरकारच्या वतीने ही योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असून, त्याबाबतचे नियम लवकरच सर्व राज्यांमध्ये लागू केले जाणार आहेत.

हे नियम अस्तित्वात आल्याने ग्राहकांना औषधांसाठी जास्त पैसे मोजावे न लागता, स्वस्त, जेनेरिक औषधे सहज उपलब्ध होऊ शकणार आहेत. अनेक राज्यांमध्ये जेनेरिक औषधे तयार होतात, पण ही औषधे गरजूंना सहज उपलब्ध होऊ शकत नाहीत. औषध विक्रेत्यांना जेनेरिक औषधांच्या विक्रीतून फारसा नफा होत नसल्याने त्यांना ही ह्या औषधांची विक्री करण्यामध्ये फारसा रस नसतो. त्याचप्रमाणे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या महागड्या औषधांसाठी तितकाच प्रभावी आणि स्वस्त पर्याय जेनेरिक औषधांच्या रूपाने उपलब्ध आहे ह्याची कल्पना बहुतेक ग्राहकांना नसते. त्यामुळे जेनेरिक औषधे तितकीच गुणकारी आणि कमी खर्चात उपलब्ध असूनही केवळ त्याबद्दलच्या अज्ञानापायी ग्राहक खिशाला सहजी परवडणार नाहीत इतकी महाग औषधे खरेदी करताना दिसून येतात.

हीच परिस्थिती लक्षात घेऊन हरियाणामधील एका सेवाभावी संस्थेच्या वतीने माननीय पंतप्रधानांना आवेदन पाठविले गेले असता, ह्या आवेदनावर विचार करून जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेसाठी नवी नियमावली संबंधित मंत्रालयाद्वारे लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment