कॅबमधून एकट्याने प्रवास करताना घ्या ही खबरदारी


बंगळूरू शहरातील एका महिलेने एअरपोर्टवर जाण्यासाठी रात्री साडे आकाराच्या सुमारास कॅब बोलाविली. एअरपोर्टकडे जात असताना कॅब चालकाने अचानक भलतेच वळण घेतल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने कॅबचालकाला त्यबद्दल विचारणा करूनही कॅब चालकाने काहीही उत्तर न देता कॅब वेगाने दामटणे सुरूच ठेवले. कॅब चालकाच्या मनामध्ये नक्की काय विचार आहेत हे लक्षात घेऊन महिलेने प्रसंगावधान राखून आरडा ओरडा करीत टोल नाक्यावरील इतर कॅब आणि वाहनचालकांचे लक्ष वेधून घेतले. त्याही लोकांच्या लक्षात खरा प्रकार येताच त्यांनी पाठलाग करून कॅब अडविली आणि त्या महिला प्रवाश्याची सुखरूप सुटका करून कॅबचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. असा प्रसंग आजच्या काळामध्ये विरळा राहिलेला नाही. असे अनेक प्रसंग भारतातील अनेक शहरांमध्ये नेहमीच घडत असतात. ह्या प्रसंगी महिला सुखरूप बचावली, पण अश्या प्रकारच्या घटनांमध्ये अडकलेले अनेक प्रवासी ह्या महिलेइतके नशीबवान ठरलेले नाहीत.

कॅब मध्ये प्रवास एकट्याने प्रवास करणे हे केवळ महिलांसाठीच धोक्याचे आहे असे नाही. हा धोका सर्वांसाठीच उद्भवू शकतो. आजकाल शाळेमध्ये जाणारी मुले देखील अनेक प्रसंगी कॅबने जाताना दिसतात. तसेच महिलांना, किंवा पुरुषांना देखील कामानिमित्त किंवा इतर काही कारणांनी कॅबने एकट्याने प्रवास करण्याची वेळ येत असते. अश्या वेळी काही गोष्टींची खबरदारी घेणे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तींना आपण संपर्क साधू इच्छितो अश्या व्यक्तींचे मोबाईल नंबर आपल्या फोनच्या स्पीड डायल सिस्टममध्ये ठेवावेत. ह्या यादीमध्ये पोलीस इमर्जन्सी सेवेचा नंबर अवश्य असावा. जर आपत्कालीन परिस्थिती उद्भविलीच तर ह्या नंबर्स पैकी एका नंबरवर त्वरित फोन करून शक्य असल्यास आपला ठावठीकाणा कळवावा.

कॅबमध्ये बसण्यापूर्वी आपल्या मित्रमंडळी, किंवा आप्तेष्टांपैकी कोणाला तरी फोन करून किंवा मेसेजद्वारे आपण घेत असलेल्या कॅबचा क्रमांक व चालकाची माहिती कळवावी. तसेच कॅब मध्ये बसताना आपले डेटा कनेक्शन व ‘जीपीएस’ नेहमी चालू स्थितीमध्ये असावे, जेणेकरून प्रवाशाला त्याद्वारे ‘ट्रॅक’ केले जाऊ शकते. कॅबमध्ये बसल्यावर ज्या अॅप द्वारे कॅब बोलाविली गेली असेल, ते अॅपही नियोजित स्थळाकडे जाण्याचा रस्ता दाखवीत असते. त्यामुळे कॅब चालक ह्याच रस्त्याने कॅब घेऊन जातो आहे किंवा नाही ह्याकडे लक्ष असावे. त्यातून जर रस्ता नेहमीचा, परिचयाचा असेल तर त्या परिसराची आपल्याला चांगली माहिती असतेच, पण आपण जाणार असू तो परिसर फारसा माहितीचा नसेल, तर अॅपची मदत घेणे आवश्यक आहे.

कॅबमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत गुन्हे घडतात, कारण प्रवासी गाडीतून बाहेर पडू शकत नाहीत, किंवा गाडीच्या खिडक्या उघडून रस्त्यावरील अन्य लोकांचे लक्ष आकर्षित करून घेऊ शकत नाहीत. असे घडण्यामागे कारण असते ते म्हणजे गाडीच्या दरवाज्यांना ‘चाईल्ड लॉक’ असणे. लहान मुलांनी अचानक गाडीचे दरवाजे, खिडक्या उघडून कोणत्याही प्रकारचे अपघात घडू नयेत ह्या करिता गाड्यांना चाईल्ड लॉक ची सुविधा दिलेली असते. पण गुन्हा घडलेल्या घटनांमध्ये मात्र कॅब चालक ही सुविधा आपल्या सोयीकरिता वापरीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कॅबमध्ये बसण्यापूर्वी दारावरील चाईल्ड लॉकचा स्वीच/बटन जरूर तपासून घ्यावा. चाईल्ड लॉक कसे लावावे आणि कसे काढावे ह्याबाबत सूचना ह्या लहानशा स्वीचजवळच दिलेल्या असतात. त्यानुसार आपल्या कॅबच्या दरवाजाला चाईल्ड लॉक लावल्याचे लक्षात आले, तर कॅबमध्ये बसण्यापूर्वी लॉक उघडून ठेवावे. ह्या काही गोष्टींची काळजी घेतल्याने कॅब प्रवासामध्ये आपण नक्कीच सुरक्षित राहू शकू.

Leave a Comment