जिओ इन्स्टिट्यूट शोधून देणाऱ्यास ११ लाख पैशांचे पारितोषिक


पुणे – केंद्र सरकारने ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’ चा दर्जा रिलायन्स फाऊंडेशनच्या अस्तित्वात नसलेल्या जिओ शिक्षणसंस्थेला दिला असतानाच पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आता यावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. मनविसेने जिओ इन्स्टिट्यूट हरवले असून सापडल्यास बक्षीस मिळवा, असे पत्रक काढले असून इन्स्टिट्यूट शोधणाऱ्या ११ लाख पैसे दिले जातील, असे मनविसेने म्हटले आहे.

जिओ इन्स्टिट्यूटला कागदावरुन प्रत्यक्षात येण्यापूर्वीच इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सचा दर्जा मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने समर्थन केले आहे. तर जिओ इन्स्टिट्यूटविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने काढलेले पत्रक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या पत्रकात जिओ इन्स्टिट्यूट हरवले असून शोधून देणाऱ्यास ११ लाख पैशांचे पारितोषिक दिले जाईल, असे यात म्हटले आहे. मनविसे पुणे शहर अध्यक्ष कल्पेश यादव याबाबत माहिती देताना म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चुकीचा निर्णय घेतला असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याच बरोबर आईओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश करावा अन्यथा मनविसे या प्रकरणी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.