सूरकुंडादेवी शक्तीपीठ- येथे पडले होते सतीमातेचे मस्तक


उत्तराखंडची भूमी अनेक प्राचीन धार्मिक स्थळांची भूमी म्हणून परिचित आहे. याच राज्यात धानोल्टी जवळ असलेल्या सूरकुंड पर्वतावरील सुरकुंडा देवीचे स्थान जगदंबेच्या ५१ शक्तीपीठातील महत्वाचे स्थान आहे. जगदंबेची हि ५१ शक्तिपीठे अत्यंत पवित्र समजली जातात. या ठिकाणांवर यज्ञात उडी घेऊन भस्म झालेल्या माता सतीचे अवयव पडले होते असा समज आहे. सूरकुंड येथे माता सतीचे मस्तक पडले होते असे मानले जाते. मुळच्या ५१ शक्तीपीठातील १ पाकिस्तान येथे, ४ बांग्ला देशात, १ श्रीलंका, १ तिबेट आणि २ नेपाल मध्ये आहेत म्हणजे भारतात आता ४२ शक्तिपीठे आहेत.


धानोल्टी येथे समुद्रसपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर असलेल्या ठिकाणी हे शक्तीपीठ आहे. असे मानले जाते कि येथेच देवराज इंद्र याने मातेची उपासना करून त्याचे गेलेले साम्राज्य परत मिळविले होते. हे मंदिर वर्षभर उघडे असते आणि भाविक येथे मातेच्या दर्शनाबरोबरच निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतात. येथून चंद्रबदनी मंदिर, चौखंबा, गौरीशंकर, नीलकंठ, डून घाटीचे दर्शन होते. देशातील हे एकमेव असे शक्तीपीठ आहे जेथे गंगा दशहरा साजरा केला जातो. त्यानिमित येथे भव्य यात्रा भरते. या काळात सूरकुंड मातेचे दर्शन घेणे विशेष फलदायी असते असा समज आहे.

गंगा दशहरा काळात जे भाविक येथे दर्शनला येतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. भगीरथाने कडक उपासनेने गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा तिच्या प्रवाहातील धारा जेथे जेथे पडल्या तेथे गंगा दशहरा साजरा केला जातो. सूरकुंड पहाडावर गंगेची एक धार पडली होती असे सांगितले जाते. हे या मंदिरात देवी कालीमातेची प्रतिमा आहे. वर्षभर येथे भाविक येत असतात.

Leave a Comment