सर्वात धनाढ्य उद्योजकांच्या यादीत वॉरन बफेंना झुकेरबर्गने पछाडले


वॉशिंग्टन – सर्वात धनाढ्य उद्योजकांच्या यादीत वॉरन बफे यांना फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी पिछाडीवर टाकले आहेत. आता झुकेरबर्ग जगातील तिसरे सर्वात धनाढ्य व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या पुढे फक्त अॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्ट फाउंडर बिल गेट्स आहेत. शुक्रवारी फेसबूकच्या शेअर्समध्ये २.४ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे, झुकेरबर्ग ब्लूमबर्गच्या बिलिअनेअर इंडेक्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच टॉप-३ धनाढ्य लोकांमध्ये सगळेच केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीमंत बनलेले लोक आहेत.

८१.६ अब्ज अमेरिकेन डॉलर (जवळपास 5612 अब्ज रुपये) इतकी संपत्ती ३४ वर्षीय मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे आहे. सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या तुलनेत झुकेरबर्ग यांच्याकडे ३७.३ कोटी अमेरिकन डॉलर जास्त आहेत. डेटा प्रायव्हसी आणि यूझर्सची माहिती चोरण्याच्या प्रकरणावरून जगभरात फेसबूकची कुप्रसिद्धी झाली. अल्पावधीसाठी गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला. त्यामुळे, फेसबूकला आर्थिक फटका सुद्धा बसला. २७ मार्च रोजी फेसबूकच्या शेअर्सची किंमत घसरून १५२.२२ डॉलरवर (प्रति शेअर) आली होती. गेल्या ८ महिन्यांची ही निच्चांकी आकडेवारी होती. परंतु, लोकांचा विश्वास पुन्हा वाढल्यानंतर शुक्रवारी फेसबूकची प्रति शेअर किंमत विक्रमी २०३.२३ डॉलर झाली.

Leave a Comment