या जंगलदेवतेला वाहिले जातात जुने सुटे भाग, नंबर प्लेट


मंदिरात जाणारा कोणताही भाविक देवासमोर नारळ, फुले, उदबत्ती अर्पण करतो, प्रसाद म्हणून फळे, मिठाई ठेवतो असा प्रघात आहे. हिमाचल मधील एक देऊळ याला अपवाद आहे. या मंदिरातील देवतेसमोर घरातील जुने मोडके समान, वाहनांचे निकामी झालेले सुटे भाग, नंबर प्लेट वहिल्या जातात. बनशिरा असे या देवतेचे नाव असून ती जंगल देवता म्हणून ओळखली जाते. साहजिक हे मंदिर जंगलाच्या मधोमध आहे.

हे मंदिर म्हणायचे पण येथे केवळ चार अर्धवट भिंती उभ्या आहेत. मंदिराला छत नाही. पुजारी नाही. मात्र तरीही या मंदिराची प्रसिद्धी दूरवर आहे. शेकडो वर्षे हि देवता येथे आहे आणि प्राचीन काळी घरातली वारंवार खराब होणारी अवजारे येथे आणून देवतेला वाहिली जाण्याची प्रथा होती. त्यात नंतर वाहनांचे खराब सुटे भाग वाहण्याची रीत पडली असे सांगितले जाते.


येथे असा समज आहे, ज्या वस्तू येथे वहिल्या जातात त्यावर देवतेची कृपा होते आणि संकट येत नाही. त्यामुळे वाहनाचा एखादा भाग वारंवार नादुरुस्त होत असेल तर तो येथे वाहिला कि नवीन भाग लवकर खराब होत नाही तसेच गाडीची नंबर प्लेट वाहिली कि संपूर्ण वाहनाला देवतेचे संरक्षण मिळते असा येथील लोकांचा गाढ विश्वास आहे. या रस्त्याने जाताना वाहन चालक आवर्जून या देवतेचे दर्शन घेतात आणि तिच्यासमोर मस्तक टेकतात. शेवटी श्रद्धेला तुलना नाही हेच यातून सिद्ध होते.

Leave a Comment