मोबाईल वापरताना घ्या या गोष्टींची काळजी


मोबाईल फोन ही आता चैनीची वस्तू राहिली नसून, गरजेची वस्तू झाली आहे. परस्परांशी संपर्कात राहण्याच्या उद्देशाने मोबाईल फोन अतिशय महत्वाचा झाला आहे. ह्याच्या मदतीने क्षणार्धात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलेल्या व्यक्तीशी बोलणे, किंवा त्याच्यापर्यंत कोणताही संदेश, छायाचित्रे पोहोचविणे आज शक्य झाले आहे. तसेच मोबाईल वरील इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने आपण जगभरातील घडामोडी घरबसल्या जाणून घेई शकतो, आपली आवडती गाणी किंवा चित्रपट, टीव्ही शो डाउनलोड करू शकतो. त्यातून मोबाईल फोन आता सर्वांच्या खिशाला परवडणारे झालेले असल्यामुळे ही सुविधा लहानांपासून मोठ्यापर्यंत जवळजवळ सर्वांच्याच हाताशी आहे. यंत्र कोणतेही असो, ते वापरताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मोबाईल फोन वापरताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अपघात होण्याचा धोका उद्भवू शकतो.

आपल्या मोबाईल फोन ला पासवर्ड असणे अतिशय आवश्यक आहे. आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्वच फोनमध्ये पासवर्ड आणि फिंगरप्रिंट आयडेन्टीफिकेशनची सुविधा असतेच. तसेच आजकाल अनेक जण आपले बँक अकाऊंट नंबर्स, आधार नंबर्स, खात्यांचे पासवर्ड, यांसारखा महत्वपूर्ण डेटा आपल्या फोनवरच सेव्ह करीत असतात. ही महत्वपूर्ण माहिती इतर कोणाच्या हाती लागून त्याद्वारे ह्या माहितीचा दुरुपयोग केला जाऊ नये, त्यासाठी आपल्या फोनला पासवर्ड असणे अतिशय आवश्यक आहे. तसेच हा पासवर्ड इतरांशी शेअर करणे टाळायला हवे. फोन चार्ज करीत असताना फोनचा वापर करणे टाळायला हवे. ह्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो.

फोनचा वापर सातत्याने काही तास केल्याने फोन ‘ओव्हरहीट’ होऊ लागतो. त्यामुळे फोनवर सातत्याने जास्त वेळ बोलणे टाळावे. त्याचप्रमणे फोनमधील नेटवर्कचा सिग्नल कमकुवत असल्यासही फोनचा वापर करणे टाळायला हवे. सिग्नल पूर्ववत होईपर्यंत वाट पहावी, आणि सिग्नल पूर्ववत झाल्यानंतरच फोनचा वापर संभाषणासाठी करावा. त्याचप्रमाणे आपल्या फोनवर कोणतेहे नवे अॅप डाउनलोड करताना त्याबद्दलचे नियम काळजीपूर्वक पाहून घेऊन मगच अॅप डाउनलोड करावे.

अनेकांना आपल्या फोन वर आपला खासगी किंवा कामाशी संबंधित डेटा सेव्ह करण्याची सवय असते. उद्देश हा, की जेव्हा ह्या डेटाची आवश्यकता वाटेल, तेव्हा हा डेटा विनासायास आपल्या हाताशी असावा. मात्र जो डेटा आपल्या फोनवर सेव्ह केलेला असेल, त्याचा अन्यत्र ही, म्हणजे आपल्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर बॅकअप घेण्यास विसरू नये. अश्याने, मोबाईल अचानक निकामी झाला, किंवा काही कारणाने त्यावरील डेटा मिळेनासा झाला, तर आपल्याकडे त्या डेटाचा बॅकअप असल्याने आपल्या कामामध्ये अडथळा उद्भवित नाही.

Leave a Comment