एअर इंडियाने अमेरिकेला प्रवास करत आहात? मग जाणून घ्या हे नवे नियम


भारत सरकाराधीन असलेल्या एअर इंडियाच्या वतीने एअर इंडियाच्या विमानांनी अमेरिकेला जाणाऱ असलेल्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. ह्या नियमांच्या नुसार आता प्रवाशांना आपल्या हँड बॅगेजमध्ये कोणत्याही प्रकारचा ‘पावडर’ सदृश दिसणारा पदार्थ बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. ह्यामध्ये साखर, मीठ, कापराची पावडर, दळलेली कॉफी, मसाले, आणि सौंदर्य प्रसाधानामध्ये वापरली जाणारी मेकअप पावडर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. ह्या बाबतची माहिती एअर इंडियाच्या वतीने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिरेकी कारवाया वाढत असून त्या पार पडण्यासाठी नवनवीन वस्तूंचा उपयोग करण्यात येत आहे, ही बाब लक्षात घेऊन अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या वतीने पावडर सदृश दिसणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली असून, त्यामुळेच एअर इंडियाच्या वतीने प्रवाशांसाठी ह्याबद्दलची माहिती विमान कंपनीद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू आर्क, शिकागो, वॉशिंग्टन डीसी, आणि सॅन फ्रान्सिस्को ह्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबई आणि दिल्लीमधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून नॉन स्टॉप फ्लाईटस् ची सेवा देणारे, एअर इंडिया हे एकमेव भारतीय कॅरियर आहे.

एअर इंडिया तर्फे प्रवाशांसाठी लागू करण्यात आलेल्या अधिसूचेनेनुसार, प्रवाशांना आता इथून पुढे आपल्या हँड बॅगेजमध्ये ३५० मिलीलीटर किंवा मिलीग्राम पेक्षा जास्त वजन असेलेली कोणतीही पावडर किंवा पावडर सदृश दिसणारा पदार्थ नेण्यास मनाई असणार आहे. अश्या प्रकारच्या पावडर्स सील केलेल्या पॅकेजमध्ये असल्या तरी त्यांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ड्युटी-फ्री असलेल्या पावडर्सचे डबे ‘सिक्युअर टँपर एव्हिडंट बॅग’ (STEB) मध्ये नेण्यास परवानगी असणार आहे. तसेच युएई (संयुक्त अरब अमिरात) आणि इतर गल्फ देशांमधून अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ह्या नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Comment