आरोग्यदायी कांद्याची साले


आपल्या आरोग्यासाठी कांदा अतिशय गुणकारी आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे, पण कांद्याप्रमाणे कांद्याची साले देखील आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. त्यामुळे पुढल्या वेळी कांदे चिरत असताना त्याची साले टाकून देण्याऐवजी त्याचा उपयोग कशा प्रकारे करता येईल हे जाणून घेऊ या. कांद्याची साले रात्रभर थोड्या पाण्यामध्ये भिजत ठेऊन सकाळी उठून त्या पाण्याचे सेवन करावे. ह्याचा स्वाद नक्कीच आवडणार नाही, पण जर तुम्हाला आवडत असेल, तर थोडा मध ह्या पाण्यामध्ये घालावा. ह्या पाण्याच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

जर काही कारणाने त्वचेवर अॅलर्जी येऊन खाज सुटत असेल, किंवा अंगावर पुरळ येत असेल, तर कांद्याची साले रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी अॅलर्जी आलेल्या ठिकाणी लावावे. हा उपाय त्वचेवरील रॅश किंवा पुरळ संपूर्णपणे जाईपर्यंत करावा. केसांचे आरोग्य चांगले राहावे, केस मुलायम, चमकदार दिसावेत ह्याकरिता आपण निरनिराळे शँपू, कंडीशनर ह्यांचा वापर करीत असतो. पण कधी काही ह्यातील रसायानांमुळे केसांचे नुकसानच अधिक होते. पण कांद्याची साले भिजवून ठेवलेले पाणी केसांच्या करिता पोषक आहे. हे पाणी केसांमध्ये लावून घेऊन काही मिनिटे राहू द्यावे, आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुवून टाकावेत.

त्वचेवर किंवा चेहऱ्यावर काळसर डाग असल्यास हे हलके करण्यासाठी कांद्याच्या सालीवर थोडीशी हळद घेऊन ती ह्या डागांवर चोळावी. हा उपाय काही दिवस करीत राहिल्याने त्वचेवरील डाग हलके होतात. तसेच सर्दी-खोकल्यामुळे घसा खराब झाल्यास किंवा खवखवत असल्यास कांद्याची साले पाण्यामध्ये टाकून आणि उकळून घ्यावे, आणि ह्या पाण्याने गुळण्या कराव्यात. ह्या मुळे घसा खवखवने थांबून, घसा दुखी देखील कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment