जांभळाप्रमाणे जांभळाच्या बिया ही आरोग्यास हितकारी


जांभूळ हे फळ मेधुमेहाच्या रोग्यांकरिता वरदान आहे, ही माहिती सर्वश्रुत आहे. पण जांभळाप्रमाणेच जांभळाच्या बियादेखील आपल्या आरोग्यासाठी तितक्याच उपयोगी आहेत. जांभळाचे झाड हे वर्षभर हिरवे राहणारे झाड असून, हे फळ भारत, बांग्लादेश आणि इंडोनेशिया ह्या प्रांतांमध्ये आढळते. आयुर्वेदामध्ये जांभळाच्या बिया अनेक व्याधींच्या उपचाराकरिता औषधी म्हणून वापरल्या जातात. युनानी आणि चीनी औषधोपचारांमध्येही जांभळाच्या बियांना महत्वाचे स्थान आहे. विशेषतः पचनाशी निगडित व्याधींमध्ये जांभळाच्या बिया विशेष लाभकारी आहेत. त्या शिवाय मधुमेहामध्येही ह्या बिया उपयुक्त असल्याने ह्या बियांचे सेवन गुणकारी मानले गेले आहे.

जांभळाचे फळ आणि त्याची बी ह्यामध्ये ‘जम्बोलीन’ आणि ‘जम्बोसीन’ नामक तत्वे असून, ह्या तत्वांमुळे रक्तामध्ये शुगर अतिशय धीम्या गतीने ‘रिलीज’ होत असते. तसेच जांभळाच्या बियांमुळे शरीरामध्ये इंस्युलीन जास्त प्रमाणात तयार होऊ लागते. त्यामुळे जांभळाचे सेवन मधुमेहींच्या करिता अतिशय फायद्याचे आहे. जांभळाच्या बिया वापरण्याकरिता, ह्या बिया आधी संपूर्णपणे सुकवून घेऊन त्याची पूड करून ठेवावी. ही पूड दररोज सकाळच्या नाश्त्यापूर्वी पाण्याबरोबर घ्यावी. ह्या उपायाने मधुमेह नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते.

‘एशियन पॅसिफिक जर्नल ऑफ ट्रॉपिकल बायोमेडिसिन’ मध्ये प्रसिद्ध केल्या गेलेल्या माहितीनुसार जांभळाच्या बियांच्या सेवनाने ब्लड ग्लुकोज लेव्हल कमी झाल्याचे व इंस्युलीनची पातळी नियंत्रित राहत असल्याचे म्हटले आहे. तसेच हायपरग्लायसीमियामध्ये ही जांभळाच्या बियांचे सेवन अतिशय गुणकारी सिद्ध होत आहे. आयुर्वेदामध्ये मधुमेहासाठी दिल्या जाणाऱ्या बहुतेक सर्वच औषधांमध्ये जांभळाचा वापर केला जातो. जांभळाचे फळ आणि बिया तुरट असून, अँटी-डाययुरेटिक, म्हणजेच लघवीचे प्रमाण कमी करणारे आहेत. तसेच जांभळामध्ये अँटी ऑक्सिडंटस् हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.

जांभळाच्या बियांचा वापर करण्यासाठी जांभळाच्या बिया स्वच्छ धुवून घेऊन, एका सुती कपड्यावर पसरवून, उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्याव्यात. ह्या बिया संपूर्णपणे सुकण्यासाठी साधारण तीन ते चार दिवसांचा अवधी लागतो. एकदा ह्या बिया चांगल्या वाळल्यानंतर त्यांचे बाहेरील आवरण काढून टाकून आतील हिरवा भाग ठेऊन घ्यावा. सर्व बियांवरील आवरण काढून टाकल्यानंतर ह्या हिरव्या बिया अर्ध्या मोडाव्यात आणि परत उन्हामध्ये चांगल्या वाळू द्याव्यात. बिया पूर्णपणे सुकल्या, की मग मिक्सरवर बारीक करून घ्याव्यात. पावडर वाटली की त्याची भरड चाळून घ्यावी. चाळणीमध्ये शिल्लक राहिलेली भरड परत मिक्सरवर बारीक करून घेऊन पुन्हा चाळून घ्यावी. ही जांभळाच्या बियांची पावडर घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेऊन आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा. ही पावडर दररोज सकाळी एक चमचा, एक ग्लास पाण्याबरोबर रिकाम्या पोटी घेतल्याने लाभ होतो. ह्या पावडरचे सेवन सुरु करण्यापूर्वी आपल्या तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment