या देशामध्ये भीकही डिजिटल…!


रस्त्यावर भीक मागत हिंडत असलेल्या भिकाऱ्याने जर एखाद्याकडे ‘कॅशलेस’ , किंवा मोबाईल वरून ‘फंड ट्रान्स्फर’ द्वारे भीक मागितली, तर त्याची प्रतिक्रिया नेमकी कशी असेल, ह्याची कल्पना आपण करू शकतो. आजकालच्या डिजिटल जमान्यामध्ये भीकही डिजिटल झाली आहे. असे खरोखरच घडते आहे चीन ह्या देशामध्ये. आपल्या भारतात काही वर्षांपूर्वी ‘डिजिटल इंडिया’ ची कल्पना रुजली, आणि जनतेने ती स्वीकारलीही. पण चीनमध्ये ह्या कल्पनेने पुढची पायरी गाठली आहे. आता येथील भिकारी मोबाईल द्वारे पैसे ‘ट्रान्स्फर’ करवून भिक मिळवीत आहेत.

येथील मेट्रो स्टेशन्स किंवा पर्यटकांची गर्दी असलेली पर्यटनस्थळे अश्या जागांवर भिकाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आढळत असून, त्यांच्या जवळ असणाऱ्या मोबाईल फोन्समध्ये डिजिटल पेमेंट अॅप किंवा क्यू आर कोड्स असतात. त्यामुळे एखाद्याला जर ह्या भिकाऱ्यांना आर्थिक मदत करायची झाली, तर आपल्या मोबाईल द्वारे भिकाऱ्याच्या मोबाईलवरील क्यू आर कोड स्कॅन करून किंवा पेटीएम सदृश अॅप वापरून पैसे ट्रान्स्फर करता येऊ शकतात.

चीन मधील भिकारी, अलिबाबा चे ‘अली पे’ किंवा ‘विचेट वॉलेट’ ह्या अॅप द्वारे नागरिकांनी त्यांना आर्थिक मदत करण्याची विनंती करतात. इतकेच नाही, तर आता डिजिटल भिक मागण्याचे चलन रूढ होत असल्यामुळे, अनेक व्यावसायिकांनी देखील वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेत, नवनवीन तऱ्हेची ‘स्पॉन्सर्ड कोड्स’ लॉन्च केली आहेत. एखाद्याने भिकाऱ्याला भिक न देता, केवळ ही कोड्स केवळ आपल्या फोनच्या सहाय्याने स्कॅन जरी केली, तरी त्या कंपनीकडून भिकाऱ्याच्या खात्यामध्ये काही पैसे जमा होतातच. अश्या रीतीने कंपनीचे प्रमोशन होते, त्यांना आवश्यक तो डेटा ही मिळतो, आणि भिकाऱ्याला देखील भिक मिळते. असा दुहेरी लाभ ह्या नवीन कोड्सच्या माध्यमातून साध्य केला जात आहे. आता चीनमधील भिकारी एका आठवड्याच्या अवधीत ४५ तास जरी भिक मागत असले, तरी ह्या डिजिटल पद्धतीमुळे त्यांना तेवढ्या अवधीमध्ये तब्बल ४५०० युआन, म्हणजेच सुमारे ४७,००० रुपये इतक्या रकमेची कमाई होऊ लागली आहे.