आता प्रवाशांना LIVE दिसणार कसे तयार होते रेल्वेच्या किचनमध्ये जेवण


नवी दिल्ली: प्रवाशांच्या मनात कायम रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल साशंकता असते. रेल्वेत मिळणारे जेवण कसे तयार केले जाते? ते तयार करताना स्वच्छता राखली जाते का? प्रवाशांच्या मनात असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळे बहुतांश प्रवासी रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ टाळतात. त्यामुळे आयआरसीटीसीने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग मॅकेनिजम आयआरसीटीसीनं विकसित केल्यामुळे ट्रेनमध्ये दिले जाणारे जेवण नेमके कसे तयार केले जाते, हे प्रवाशांना पाहता येणार आहे.

मुंबईत झालेल्या एका बैठकीत याबद्दलची सूचना रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. यानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी काल आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रिमिंग सेवेचे उद्घाटन केल्यामुळे आता आयआरसीटीसीकडून तयार केल्या जाणाऱ्या जेवणाचे किचनमधून लाईव्ह स्ट्रिमिंग होईल. यामुळे प्रवाशांना आपल्याला मिळणारे जेवण कसे तयार केले जाते, ते तयार करताना आसपास स्वच्छता असते का, हे पाहणे शक्य होईल. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील गॅलरी सेक्शनमध्ये या व्हिडीओंची लिंक शेअर केली जाईल. यामुळे खाद्यपदार्थ नेमके कसे तयार केले गेले, हे प्रवाशांना अगदी सहज पाहता येईल.

Leave a Comment