जीमेल उपभोगत्यांना थर्ड पार्टी अॅप्सपासून धोका नाही


सॅन फ्रान्सिस्को – जीमेल उपभोगत्यांचे अकाउंट थर्ड पार्टी अॅप्स वाचू शकत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याविषयी गुगलने स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत गुगलने सांगितले, की सतत जीमेलशी संलग्न डेव्हलपर व त्यांच्या अॅप्सचे मूल्यमापन कंपनी करत असून थर्ड पार्टी अॅप डेव्हलपर्सना गुगल जीमेल अकाउंटमध्ये डोकावण्याची परवानगी देत असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केले होते.

गुगल आपल्या वापरकर्त्यांच्या जीमेल अकाउंट इनबॉक्समध्ये डोकावण्याची संधी बाहेरील शेकडो सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना देते. त्याचबरोबर हे डेव्हलपर्स खरेदीची तुलना, प्रवासाचे नियोजन व इतर इमेल आधारित सेवांद्वारे साईन अप करणाऱ्या लाखो जीमेल वापरकर्त्यांचा इनबॉक्स वाचत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

ईमेल क्लाएंट, ट्रीप प्लानर व कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट यासारख्या यंत्रणांद्वारे इतर डेव्हलपर अॅप्सना आम्ही जीमेलशी संलग्न करण्याची परवानगी देतो. यामुळे आपला इमेल कसा वापरावा यासाठी तुम्हाला पर्याय उपलब्ध होतील, असे गुगल क्लाउडच्या सुरक्षा, निष्ठा व गोपनीयता विभागाच्या संचालिका सुझान फ्रे यांनी सांगितले. गुगलव्यतिरिक्त अॅप्सद्वारे तुमचे जीमेल मॅसेज तपासले जाण्यापूर्वी त्याची विविध पायऱ्यांद्वारे तपासणी केली जाते. यामध्ये स्वयंचलित व स्वहस्ते तपासण्यांचा समावेश असल्याचे फ्रे यांनी सांगितले आहे.

तुमचा डेटा गुगलव्यतिरिक्त अॅपद्वारे हाताळला जाण्यापूर्वी स्क्रीनवर आम्ही एक परवानगीपत्र दाखवतो. अॅप कोणता डेटा वापरेल व ते त्या डेटाचा कसा वापर करेल, हे यावर स्पष्ट दाखवले असते. गुगलव्यतिरिक्त कोणत्याही अॅपला परवानगी देण्यापूर्वी हे परवानगीपत्र वाचावे, असा आमचा सल्ला आहे, असेही फ्रे यांनी सांगितले.

Leave a Comment