वैद्यकीय क्षेत्रामध्ये या महिला डॉक्टर्सनी निर्माण केले स्वतःचे वेगळे स्थान


रुग्णांना जीवनदान देणारे, निरनिरळ्या आजारांमधून रुग्णांची मुक्तता करणारे असे डॉक्टर्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आजार लहान असो, किंवा मोठा, आपले आरोग्य आपल्या डॉक्टर्सच्या हातामध्ये सोपवून आपण निर्धास्त होतो. ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही महिला डॉक्टर्स अश्या ही आहेत, ज्यांनी आपल्या कार्यामुळे आपले आगळे स्थान निर्माण केले आहे.

डॉक्टर भक्ती यादव ह्यांचा जन्म १९२६ साली उज्जैन येथे झाला. त्या काळी मुलींना फारसे शिकविले जात नसे. पण भक्तीने मात्र शिकण्याचा हट्ट धरल्याने तिला शाळेमध्ये भारती केले गेले. शालेय शिक्षण पूर्ण करून भक्तीने महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले आणि एमबीबीएस करिता प्रवेश मिळविला. १९५२ साली वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर डॉक्टर भक्ती ह्यांनी ‘वात्सल्य’ नामक नर्सिंग होम सुरु केले. केवळ नावापुरती फी घेऊन उत्तम उपचार ही डॉक्टर भक्ती ह्यांची खासियत होती. अनेक गरजू व्यक्तींवर डॉक्टर भक्ती मोफत उपचार करीत. त्यांची ही सेवा, त्याच्या मृत्युपर्यंत अखंड सुरूच राहिली. २०११ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा सम्मान देऊन डॉक्टर भक्ती ह्यांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला. आपल्या ६४ वर्षांच्या सेवेमध्ये ‘दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर भक्ती ह्यांनी एक लाख महिलांच्या प्रसूती केल्या.

१८८६ सालचा काळ असा होता, जेव्हा महिलांनी शिकणे सवरणे तर लांबच, त्यांना कारणाशिवाय घराबाहेर पडण्यासही मनाई असे. त्याकाळी वैद्यकीय पदवी मिळविलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून प्रसिध्द आहेत. १८६५ साली पुण्यामध्ये जन्मलेल्या आनंदीबाईंचा विवाह त्या अवघ्या नऊ वर्षांच्या असताना झाला. त्यांचे पती त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंना अपत्य झाले खरे, पण ते जन्मतःच आजारी होते. योग्य उपचार न मिळाल्यामुळे हे अपत्य जगले नाही. तेव्हा योग्य उपचार मिळणे किती आवश्यक आहे ह्याची जाणीव होऊ आनंदीबाईंनी वैद्यकशास्त्रामध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती गोपाळराव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. १८८६ साली आनंदीबाईना वैद्यकशास्त्राची पदवी मिळून त्या भारतातील प्रथम महिला डॉक्टर बनल्या. मात्र वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षीच त्यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला.

पाकिस्तानातील शिकारपूर येथे जन्मलेल्या डॉक्टर इंदिरा अहुजा ह्यांचा परिवार फाळणीनंतर भारतामध्ये आला. इंदिरा ह्यांचे शिक्षण बेळगाव येथे झाले. इंदिरा ह्यांनी मुंबईमध्ये मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर त्यांनी एमडी ही पदवी देखील प्राप्त केली. १९८६ साली डॉक्टर इंदिरा अहुजा ह्यांनी वैद्यक शास्त्रामध्ये नवा इतिहास घडविला. त्याच्या अथक परिश्रमांनी केलेल्या रिसर्च आणि यशस्वी प्रयोगांच्या फलस्वरूप देशतील पहिले टेस्ट ट्यूब बेबी मुंबईमधील केइएम हॉस्पिटलमध्ये जन्माला आले. आजच्या काळामध्ये टेस्ट ट्यूब बेबी ही संकल्पना फारशी नवी नसली, तरी त्याकाळी ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. डॉक्टर अहुजा ह्यांच्या ह्या मोलाच्या कार्यासाठी २०११ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले.

Leave a Comment