व्यवसायाने शिंपी असून बनला’लाम्पेदुसा’चा राजा


ही घटना आहे दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळातली. ब्रिटीश वायुसेनेतील फ्लाईट सार्जंट सिडनी कोहेनला त्याच्या आयुष्यामध्ये पुढे घडणार असलेल्या घटनांची पुसटशी देखील कल्पना नव्हती. कोहेन अनाथ असून लंडन शहरामध्ये त्यांचे वास्तव्य होते. लहानपणीच त्यांनी कपडे शिवण्याचे कौशल्य आत्मसात केल्यामुळे पोटापुरती कमाई होत असे. वयाच्या विसाव्या वर्षी ब्रिटीश वायुसेनेमध्ये कोहेन भरती झाले. अश्या रीतीने त्यांच्या वायुसेनेतील कारकिर्दीला सुरुवात झाली.

कोहेनचे आयुष्य संपूर्णपणे पालटवून टाकणारी ही घटना घडली तो दिवस होता १२ जून १९४३ चा. त्यादिवशी आपल्या सहकाऱ्यांसह कोहेन ह्यांनी माल्टा द्वीपावरून उड्डाण केले. जर्मन वायुसेनेचे एक विमान भूमध्य सागरामध्ये कोसळले असल्याचे वृत्त आल्याने त्याचा अधिक तपास करण्यासाठी कोहेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उड्डाण भरले होते. पण ज्या ठिकाणी विमान कोसळले असल्याचे वृत्त होते, तिथे कोणत्याही प्रकारचे अवशेष न सापडल्याने कोहेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अचानक विमानाचे दिशादर्शक निकामी झाले, दूर संचार यंत्रणाही बंद पडली. तशातच विमानातील इंधन देखील संपणार असल्याचे लक्षात येताच हाताशी असलेल्या नकाशावरून कोहेन ह्यांनी आपण नक्की कुठे आहोत ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे विमान इटलीजवळील लाम्पेदुसा द्वीपाच्या जवळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

ह्या द्वीपावर हिटलरचा सहयोगी असलेल्या मुसोलीनीचे ४००० पेक्षाही अधिक सैनिक तैनात असून, इथे उतरणे धोक्याचे होते. मित्र देशांना सिसिलीवर अधिपत्य स्थापित कारणासाठी लाम्पेदुसा हवे होते, त्यामुळे मुसोलिनीपासून हे द्वीप सोडविण्याच्या हेतूने मित्र देशांकडून ह्या द्वीपावर सतत हल्ले होत होते. अश्या परिस्थितीमध्ये कोहेन पुढे दोनच पर्याय होते, एक म्हणजे विमान द्वीपावर उतरविणे किंवा समुद्रामध्ये ‘क्रॅश लँड’ करणे. त्यामुळे कोहेनने विमान लाम्पेदुसावर उतरविण्याचा निर्णय घेतला. विमान जमिनीवर उतरविताच तिथे असणाऱ्या सैनिकांचा एक घोळका कोहेनकडे धावत आला, आणि आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे ह्या सैनिकांची अवस्था मोठी बिकट झाली होती आणि मित्र देशांपुढे आत्मसमर्पण करणे एवढा एकाच पर्याय त्यांच्यासमोर होता. मात्र सततच्या बॉम्बहल्ल्यांमुले त्यांची दूरसंचारयंत्रणा निकामी झाल्याने आत्मसमर्पण करण्याची त्यांची इच्छा ते मित्रदेशांपर्यंत पोहोचवू शकत नव्हते.

सैनिकांच्या प्रमुखाने आपण आत्मसमर्पण करीत असल्याचा लेखी दाखला कोहेनकडे सुपूर्द केला आणि त्याचबरोबर संपूर्ण द्वीप त्याच्या ताब्यात दिले असल्याचे सांगितले. तिथे उपलब्ध असलेले इंधन आपल्या विमानामध्ये भरून घेऊन कोहेन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सैनिक प्रमुखाच्या आत्मसमर्पणाच्या संदेशानिशी उड्डाण करण्यासाठी सिद्धता केली. त्यावेळी अचानक हवाई हल्ले सुरु झाल्याने हा उड्डाणाचा प्रयत्न कोहेनला स्थगित करावा लागला. असे आणखी तीन अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर चौथ्या वेळच्या प्रयत्नांना मात्र यश आले आणि कोहेनच्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. माल्टा येथील विमानतळावर सुखरूप परतल्यानंतर लाम्पेदुसा येथे तैनात असणाऱ्या सैनिकांचा संदेश कोहेनने आपल्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. सतत नाझी आक्रमणाची भीती मनामध्ये बाळगून असलेल्या ब्रिटनला हा संदेश म्हणजे पर्वणीच होती. त्यानंतर लाम्पेदुसाच्या राज्यपालांनी १३ जून रोजी औपचारिकरित्या शरणागती स्वीकारली. हा मोलाचा संदेश कोहेन ह्यांनी आणल्यामुळे त्यांचा उल्लेख ‘लाम्पेदुसा चे राजे’ म्हणून केला गेला.
विश्व युद्ध समाप्त होईपर्यंत कोहेन वायुसेनेमध्ये कार्यरत होते. १९४६ साली कोहेन ह्यांचे विमान अचानक बेपत्ता झाले. त्या विमानाचे आणि पर्यायाने कोहेनचे पुढे काय झाले ह्याचा शोध कधीच लागू शकला नाही. ‘लाम्पेदुसाच्या राज’ची कारकीर्द अश्या रीतीने संपुष्टात आली.

Leave a Comment