काय आहे ‘वर्ल्ड यूएफओ’ दिवसाचा उद्देश ?


‘अन-आयडेन्टीफाईड फ़्लाईन्ग ऑबजेक्टस्’, म्हणजेच यू एफ ओ, किंवा ज्याला साध्या भाषेमध्ये आपण उडत्या तबकड्या म्हणू शकतो, ह्यांचे अस्तित्व हा गेल्या अनेक दशकांपासून वादाचा विषय ठरत आलेला आहे. काहींच्या मते अश्या प्रकारच्या यूएफओ अस्तित्वातच नाहीत, तर काही जण, यूएफओ अस्तित्वात असून, अनेकदा अगदी स्पष्टपणे दिसल्याचा दावा करताना आढळतात. म्हणूनच दोन जुलै हा दिवस जागतिक यूएफओ दिवस म्हणून साजरा केला जातो. यूएफओचे दर्शन जुलै महिन्यामध्ये जास्त होत असते अशी समजूत असल्याने जगभरातील अनेक देशांमधील अनेक हौशी मंडळी आपापल्या घरांच्या गच्च्यांवर किंवा मोकळ्या माळरानांमध्ये टेलिस्कोप घेऊन. एखाद्या यूएफओचे दर्शन घडण्याची आतुरतेने वाट पाहताना दिसतात.

जागतिक यूएफओ दिवस, लोकांमध्ये यूएफओ ह्या संकल्पनेबद्दल जागरुकता, कुतूहल वाढावे ह्या उद्देशाने साजरा केला जातो. आजवर निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वेळी अनेक व्यक्तींना यूएफओचे दर्शन घडले आहे. अश्या प्रकारच्या यूएफओ अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये अनेकदा पहिल्या गेल्या. जर्मनीतील न्यूरेनबर्ग ह्या ठिकाणी यूएफओ पाहिल्याची घटना, लेखी उल्लेख असलेली इतिहासातील सर्वप्रथम घटना आहे. यूएफओचे हे दर्शन १५६१ साली लोकांना घडल्याची नोंद आहे. त्यावेळी लोकांना आकाशामध्ये प्रचंड आकारांचे ‘ग्लोब्स’, ‘क्रॉस’ आणि विचित्र आकारांच्या विशालकाय तबकड्या दिसल्याचा उल्लेख लेखी आणि चित्ररूपातही उपलब्ध आहे.

त्यांनतर १८९७ साली टेक्सास प्रांतातील लोकांनी आकाशामध्ये सिगारेटच्या आकराचे यूएफओ दिसल्याचा दावा केला. हे विशालकाय यूएफओ तेथील पवनचक्कीवर आदळले असल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे होते. हे तथाकथित यान पवनचक्कीला धडकल्याने दुर्घटनग्रस्त झाले. ह्या यानातील अवशेषांमध्ये एलियन्सची शवे मिळाल्याचा दावा ही केला गेला. ही शवे अज्ञात स्थळी दफन केली गेली गेली असे म्हटले जाते. त्यानंतर १९४७ साली अमेरिकेतील क्रॉसवेल ह्या ठिकाणी एका व्यक्तीला, एका भल्या मोठ्या अवकाशयानाचे अवशेष दृष्टीस पडले. हे यान परग्रहावरून आले असल्याचा दावा सुरुवातीला केला गेला असला, तरी त्यानंतर अमेरिकी वायू सेनेने हे अवशेष, टेहळणी साठी वापरल्या जाणाऱ्या ‘बलून’चे असल्याचे म्हटले होते. तसेच ह्याच वर्षी एका अमेरिकन वैमानिकाने देखील आकाशामध्ये यूएफओ पाहिल्याचे म्हटले होते.

१९५१ साली नवी दिल्ली येथील एका फ्लाईंग क्लबच्या सदस्यांनी सुमारे शंभर फुट लांबीचे यूएफओ पाहिल्याचे म्हटले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास यूएफओने दर्शन दिले होते. १९५२ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथेही यूएफओ पाहिली गेली. येथील अँड्र्यू वायुसेन स्थळाच्या रडारवर अनेक विचित्र वस्तू आकाशामध्ये उडत असल्याचे संकेत त्यावेळी मिळाले होते. २००६ साली शिकागोमध्ये ओ हारे विमानतळाच्या परिसरामध्ये यूएफओ दृष्टीस पडले होते, तर २००८ साली कोलकाता शहरामध्ये अगदी पहाटेच्या वेळी आकाशातून एक मोठी तबकडी अतिशय वेगाने सरकताना लोकांनी पहिली होती. २०१३ साली चेन्नई शहरामध्ये रात्री साडे आठच्या सुमारास यूएफओ पाहिली गेली, तर त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये भारतीय सेनेच्या जवानांनी लद्दाखमध्ये अनेक यूएफओ पाहिल्याचे समजते.

Leave a Comment