माता चंडीच्या या मंदिरात रोज येतो अस्वलाचा परिवार


भारतात मंदिरे, देवळे असंख्य आहेत आणि अनेक मंदिरांना अध्यात्मिक, चमत्कार यांची जोड आहे. अनेक कारणांनी ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यात छत्तीसगडच्या महासमुंद जिल्यातील धुंचापाली येथे असलेले १५० वर्षे जुने चंडीमाता मंदिर निराळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. या मंदिरात सायंकाळच्या पूजेच्या वेळी रोज एक घटना घडते जी उपस्थिताना थक्क करते. या मंदिरात रोज एका अस्वलाचे कुटुंब देवीच्या दर्शनाला येते, मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते, प्रसाद घेते आणि जंगलात निघून जाते.


या गावात चंडीमातेचे हे मंदिर एका पहाडावर आहे. १५० वर्षे जुन्या या मंदिरात पूर्वी तंत्रपूजा केली जात असे असे स्थानिक सांगतात. देवीची प्रतिमा स्वयंभू असून ती २३ फुटी आणि दक्षिणमुखी आहे. येथे पूर्वी तांत्रिक साधू संत पूजा करत असत मात्र १९५० पासून ते सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाले आहे. दक्षिणमुखी देवीमुळे या मंदिराचे महत्व वेगळे असल्याचे सांगितले जाते.

या मंदिरात सायंकाळी आरतीच्या वेळी अस्वलाचा संपूर्ण परिवार येतो. वास्तविक माणूस आणि अस्वल आमनेसामने येणे घातकच. मात्र ही अस्वले कुणालाही दुखापत करत नाहीत. आरतीच्या वेळी एक अस्वल बाहेर थांबते आणि बाकीची मंदिरात जाऊन दर्शन घेतात. मग सगळे कुटुंब प्रदक्षिणा करते. प्रसाद घेते आणि आल्यावाटेने जंगलात निघून जाते. या परिवाराचे नामकरण स्थानिकांनी जांबुवंत परिवार असे केले आहे.

Leave a Comment