टॉयलेटच्या फ्लश टँकवर दोन बटने कशासाठी?


जर एखाद्या वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लश टँक कडे तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर, काही फ्लश टँक्सच्या वर दोन वेगळी बटने तुम्ही पाहिली असतील. ह्या दोन्ही बटनांचे काम खरे तर एकच, टॉयलेटमध्ये पाणी फ्लश करण्याचे. मग तरीही दोन वेगवेगळी बटने देण्यामागचा उद्देश नेमका काय असावा? अश्या प्रकारचे ‘ड्युअल’ किंवा दुहेरी फ्लश बनविण्याची मूळ कल्पना अमेरिकन उद्योगपती आणि डिझायनर विक्टर पापानेक ह्यांची आहे. १९७६ साली प्रकाशित झालेल्या ‘ डिझाईन फॉर द रियल वर्ल्ड ‘ ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ड्युअल फ्लश टँकची कल्पना मांडली आहे. अर्थातच तेव्हापासून आतापर्यंत, इतर वस्तूंच्या प्रमाणेच, ह्या ड्युअल फ्लशच्या तंत्रज्ञानानेही पुष्कळ प्रगती केली आहे.

ड्युअल फ्लशिंग सिस्टममध्ये पाणी फ्लश करण्यासाठी दोन वेगवेगळी बटने दिलेली असतात. ह्यातील एक बटन लहान असते, तर दुसरे त्यापेक्षा मोठे असते. ह्या दोन्ही बटनांचे ‘अॅक्टीव्ह व्हाल्व्ह’ ही वेगवेगळे असतात. तसेच दोन्ही बटनांसाठी फ्लश टँकमधील पाण्याच्या पातळ्या देखील वेगळ्या असतात. ह्या दोन्ही बटनांपैकी लहान बटनामुळे सुमारे साडे तीन ते चार लिटर पाणी फ्लश होते, तर मोठ्या बटनामुळे सात ते नऊ लिटर पाणी फ्लश केले जाते. लहान बटन ‘लिक्विड वेस्ट’ फ्लश करण्यासाठी तर मोठे बटन ‘सॉलिड वेस्ट’ फ्लश करण्यासाठी वापरले जाते. ह्या ड्युअल फ्लशिंग सिस्टममुळे पाण्याची बचत होते. अश्या प्रकारच्या फ्लशिंग सिस्टम्समुळे एका वर्षामध्ये प्रत्येक परिवारामागे सुमारे वीस हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

१९७६ साली व्हिक्टर पापानेक ह्यांनी अश्या प्रकारच्या ड्युअल फ्लशिंग सिस्टमची कल्पना आपल्या पुस्तकामध्ये मांडल्यानंतर १९८० साली ऑस्ट्रेलिया देशामध्ये सर्वप्रथम ह्या प्रकारच्या फ्लशिंग सिस्टम्सचा वापर सुरु झाला. त्यांनतर अश्या प्रकारची फ्लशिंग सिस्टम वापरल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते आहे हे लक्षात आल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्येही ड्युअल फ्लशिंग सिस्टम्सचा वापर सुरु झाला. भारतामध्येही आता अश्या प्रकारच्या ड्युअल फ्लशिंग सिस्टम्सचा वापर होताना दिसू लागला आहे.

Leave a Comment