११४ वर्षे बांधकाम सुरु असलेले राधास्वामी मंदिर ऑगस्टमध्ये पूर्ण होणार


आग्रा जसे ताजमहाल साठी प्रसिद्ध आहे तसेच या शहराची कीर्ती आता राधास्वामी मंदिरामुळेहि जगभर होणार आहे. विशेष म्हणजे गेली ११४ वर्षे या मंदिराचे बांधकाम सुरु असून आता कारागिरांची ४ थी पिढी येथे काम करते आहे. संन्यासी परमपुरुष धानीस्वामी याच्या २०० व्या जयंतीपूर्वी मंदिराचे काम पूर्ण करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असून स्वामीची जयंती ऑगस्ट मध्ये आहे.

सध्या मंदिराच्या घुमटाचे काम पुरे केले जात आहे. एकाखाली एक दोन घुमट असलेले जगातील हे एकमेव मंदिर आहे. घुमट हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. स्वामी बागेत हे मंदिर उभारले जात असून त्याला ५ अतिभव्य प्रवेशद्वारे आहेत. कोत्यावधी भाविकांचे हे श्रद्धा स्थान आहे. पाच रंगांच्या विविध संगमरवरी दगडात हे काम केले जात असून हे संगमरवर देशाच्या विविध राज्यातून आणले गेले आहे. येथे रोज २५०-३०० कामगार काम करत आहेत.

१९०४ मध्ये या मंदिराचा पाया घातला गेला.५२ विहिरींवर हा पाया आहे. ६० फुट खोल पाया भरला गेला असून घुमटाची जमिनीपासून उंची १६१ फुट आहे. मंदिराचे डिझाईन इटालियन कंपनीने केले होते. १२० फुट लांब आणि ७६ फुट उचीचे प्रवेशद्वार आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी लागलेला पैसा संतानी स्वेचछेने दिला असून कोणाकडूनही देणगी घेतली गेलेली नाही. संपूर्ण मंदिरात कुठेही जोड दिला गेलेला नाही हे याच्या बांधकामाचे विशेष आहे. दरवर्षी या बांधकामावर ७ कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

Leave a Comment