जिओ आता देणार 5G सेवा


मुंबई : रिलायन्स जिओने 4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे. याची रणनिती आखायलाही जिओने सुरुवात केली आहे. अमेरिकेची दुरसंचार कंपनी रॅडिसिससोबत यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने करार केला आहे. रॅडिसिसमधील सगळे शेअर रिलायन्स लवकरच खरेदी करेल. याबाबत रिलायन्सकडून शेअर बाजारामध्ये माहिती देण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार ओपन टेलीकॉम प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सचे रॅडिसिस नेतृत्व करते. हा करार भविष्यात 5G सुविधा देण्यासाठी करण्यात आला आहे.

याबाबत दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स जवळपास ७.४ कोटी डॉलर देऊन रॅडिसिस कंपनीचे १०० टक्के शेअर खरेदी करणार आहे. शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार १.७२ डॉलर प्रति शेअर एवढी किंमत रिलायन्स मोजणार आहे. जिओला या खरेदीमुळे 5G सेवा देण्यासाठी मदत होईल, असे वक्तव्य आकाश अंबानींनी केले आहे. हा करार २०१८ सालच्या चौथ्या तिमाहीमध्ये पूर्ण होईल असे बोलले जात आहे.

या कराराची घोषणा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याच्याच दिवशी करण्यात आली. देशभरामध्ये रिलायन्स जिओचे २० कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. जिओची 5G सेवा २०१८ मध्येच सुरु होण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओने याची घोषणा बार्सिलोनामध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्येच केली होती. यासाठी जिओने मोबाईल कंपनी सॅमसंगसोबत करारही केला आहे. आता रॅडिसिससोबत झालेल्या करारानंतर 5G सेवा देण्यासाठी जिओने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Leave a Comment