इतिहास आपल्या आवडत्या 'इडली'चा - Majha Paper

इतिहास आपल्या आवडत्या ‘इडली’चा


सकाळचा नाश्ता असो, दुपारचे, रात्रीचे जेवण असो, किंवा मधल्या वेळेची भूक शमविणे असो, वाफाळत्या सांबार आणि खमंग चटण्यांच्या जोडीने खाल्ला जाणारा इडली हा पदार्थ कधीही, कोणत्याही वेळेला पसंत केला जातो. दक्षिण भारतातील राज्यांची खासियत असलेल्या ह्या पदार्थाचा आस्वाद आता भारतामध्ये आणि विदेशांतही सगळीकडे आवडीने घेतला जात असतो. बनविण्यास सोपी, चविष्ट, आणि पचायला हलकी असे पूर्णान्न असलेली इडली, आता विविध प्रकारे बनविली जाऊ लागली आहे. निरनिराळ्या भाज्या, पीठे वापरून मूळच्या इडलीने क्वचित आपला अवतार काहीसा बदलला असला, तरी हा पदार्थ लहानांपासून वयस्क लोकांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे. हा पदार्थ आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये नेमका कसा आला, ह्याचा इतिहासही मोठा रोचक आहे.

पाकशास्त्र विशेषज्ञांच्या आणि इतिहासकारांच्या मते ह्या पदार्थाचे मूळ इंडोनेशिया ह्या देशामध्ये असावे, कारण इंडोनेशियन खाद्य संस्कृतीमध्ये बहुतेक पदार्थ वाफवून तयार केले जातात. इंडोनेशियन खाद्यपरंपरेची खासियत असलेला ‘केडली’ हा पदार्थ देखील आपल्या इडलीशी मिळता जुळता आहे. ‘केडली’ ह्या पदार्थासोबत ‘बुरा’ नामक सुक्या खोबऱ्याची चटणी तोंडी लावण्यास दिली जाते. आपल्याकडेही इडली सोबत खोबऱ्याची, दाण्याची आणि इतर अनेक प्रकारच्या ओल्या, सुक्या चटण्या देण्याची पद्धत आहेच.

भारत आणि इंडोनेशिया ह्या दोन्ही देशांमधील प्राचीन काळापासून चालत आलेले व्यावसायिक नातेसंबंध पाहता, इडली, व्यापारासाठी भारतामध्ये आलेल्या व्यापाऱ्यांच्या सोबत भारतामध्ये आली असावी असे वाटते. इतिहासकारांच्या मते ‘इडली’ हा शब्द ‘ईड्डलिगे’ नामक शब्दावरून वापरात आला असावा. ह्या शब्दाचा उल्लेख ९२० साली शिवकोटीआचार्य ह्यांनी लिहिलेल्या ‘वड्डाराधने’ नामक कन्नड भाषेतील ग्रंथामध्ये आलेला आहे. इडली ह्या पदार्थाचा उगम अन्यत्र, इतर कुठल्या प्रांतामध्ये झालेला असला, तरी हा पदार्थ बनविण्याची पद्धत दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीने प्रसिद्ध केली. आजच्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये आणि जगभराताही ह्या पदार्थाने आपली खास ओळख निर्माण केली आहे.

Leave a Comment