पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ


नवी दिल्ली – आता ३१ मार्च २०१९ पर्यंत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० जूनपर्यंतची मुदत यापूर्वी देण्यात आली होती. पण शनिवारी करदात्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली.

आतापर्यंत पॅन-आधार लिंक करण्यासाठी ३१ जुलै २०१७, ३१ ऑगस्ट २०१७, ३१ डिसेंबर २०१७, ३० जून २०१८ व आता ३१ मार्च २०१९ अशी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. ३३ कोटींपैकी १६ कोटी ६५ लाख पॅन कार्ड गेल्या मार्चअखेरपर्यंत आधारशी लिंक केल्याची माहिती आहे.

बँक खाते, मोबाइल क्रमांक आदींसाठी आधार लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. तसेच एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्राने केलेल्या आधार सक्तीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने विविध सेवांना आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते. सरकारने त्यावेळी अतिरिक्त दोन महिने वाढवत ३० जूनपर्यंतची मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा पुढील वर्षाच्या ३१ मार्च २०१९पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

Leave a Comment