आरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी


आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारे अनेक पदार्थ केवळ आपल्या भोजनाची चव वाढविण्याच्या कामी येतात असे नाही, तर त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यालाही अनके तऱ्हेने लाभ होत असतात. असाच एक पदार्थ म्हणजे कसुरी मेथी. एखादी भाजी, किंवा छोले, पुऱ्या, ह्यांसारख्या पदार्थांमध्ये कसुरी मेथीचा वापर आपण अनेकदा करीत असतो. हीच कसुरी मेथी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायद्याची आहे. आयुर्वेदामध्ये कसुरी मेथीला औषधी मानले गेले आहे.

कसुरी मेथीच्या वापराने पोटासंबंधी विकार, पचनाशी निगडीत समस्या ठीक होण्यास मदत मिळते. त्यामुळे आपल्या भोजनामध्ये कसुरी मेथीचा वापर नियमित करणे अगत्याचे आहे. आपल्या दररोजच्या भाजी-आमटीमध्ये अर्धा लहान चमचा कसुरी मेथी घातल्याने पदार्थाला आगळी चवही येईल आणि त्याचे लाभही शरीराला मिळतील. ज्या महिला आपल्या नवजात अर्भकाला स्तनपान करवीत असतील, त्यांच्यासाठी कसुरी मेथी विशेष लाभकारी आहे. कसुरी मेथीमध्ये असणाऱ्या एका विशिष्ट कंपाऊंड मुळे मातेच्या अंगावरील दुध वाढते असे म्हणतात.

अनेक व्यक्तींना अनिमियाचा विकार असतो. महिलांमध्ये हा विकार जास्त प्रमाणात आढळतो. अश्या वेळी शरीरामध्ये सतत थकवा येणे, अशक्तपणा अश्या समस्या उद्भवू लागतात. हे समस्या दूर करण्याकरिता आपल्या दैनंदिन आहारामध्ये कसुरी मेथी समाविष्ट केल्याने लाभ होतो. तसेच शरीरामध्ये निरनिराळ्या कारणांमुळे उद्भविणारे हार्मोन्सचे असंतुलन दूर करण्यासाठी कसुरी मेथी सहायक आहे. कसुरी मेथीच्या नियमित सेवनाने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. ह्यासाठी आपल्या आहारामध्ये कसुरी मेथी समाविष्ट करावी, किवा दररोज सकाळी अर्धा चमचा भिजविलेले मेथी दाणे पाण्यासोबत घ्यावेत. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही